विनायक मेटे (संग्रहित - संपादित प्रतिमा)

मोदी सरकारच्या काळात गेल्या काही महिन्यांपासून अनेक गावांची नावे बदलण्यात आली. महाराष्ट्रातही औरंगाबादचे नाव बदलण्याची मागणी जोर धरत होती. आता महाराष्ट्रातील एक महत्वाचा जिल्हा बुलढाणा (Buldhana), याचे नाव बदलून ते राजमाता जिजाऊनगर करावे अशी मागणी करण्यात येत आहे. येत्या 12 तारखेला राजमाता जिजाऊ यांची जयंती असून याच पार्श्वभूमीवर सरकाराने बुलडाणा जिल्ह्याचे नाव बदलावे अशी मागणी शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी केली आहे.

आज जालना येथे मेटे यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्यावळी त्यांनी ही मागणी केली. तसेच आपली ही मागणी मान्य झाली नाही तर संघटनेकडून आंदोलन करण्यात येईल अशा इशाराही त्यांनी दिला आहे. याधीही अनेकवेळा ही नामांतराची मागणी सरकारपुढे मांडण्यात आली होती, मात्र प्रत्येकवेळी सरकारने याकडे दुर्लक्ष केले. मात्र आता सरकारने यावर काही ठोस निर्णय घेणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले.

मेटे हे छत्रपती शिवाजी महाराज समितीचे अध्यक्ष आहेत. चार वर्षांत भाजपने त्यांना मंत्रिपद दिले नसल्याची खंतही त्यांनी यावेळी बोलून दाखवली. पक्षात मिळणाऱ्या चुकीच्या वागणुकीमुळे नाराज असलेले मेटे यांनी नुकतेच मुख्यमंत्र्यांना जिल्हा परिषदेच्या सत्तेतून बाहेर पडण्याचा इशारा दिला होता.