औरंगाबाद: 10 वर्षाच्या पुतण्याला निर्दयी काकाने बेदम मारहाण करत दिले गरम प्लेटचे चटके
(Archived, edited, symbolic images)

महाराष्ट्रात कोरोना विषाणूने (Coronavirus) थैमान घातले असतानाच राज्यात अनेक विचित्र घटना समोर येत आहेत. औरंगाबादमध्ये (Aurangabad) 10 वर्षाच्या पुतण्याला निर्दयी काकाने बेदम मारहाण करत गरम प्लेटचे चटके दिल्याची घटना उघडकीस आली आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर आरोपी काकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच त्याच्याविरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. आई-वडिलांचे छत्र हरवल्यामुळे हा मुलगा आपल्या काकाकडे राहत होता. मात्र, क्षुल्लक कारणावरून त्याच्या काकाने त्याला बेदम मारहाण केली आणि गरम प्लेटचे चटके दिले.

दरम्यान, या सर्व प्रकाराचा एक व्हिडिओ गुरुवारी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर पोलिसांनी काकाला ताब्यात घेतले. या धक्कादायक प्रकारामुळे पुतण्या-काकाच्या नात्याला काळीमा फासला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ पाहून नेटीझन्सनी संताप व्यक्त केला आहे. (हेही वाचा -  मुंबई: कोंबडीचे यकृत खरेदी करण्याऐवजी चॉकलेटवर 10 रुपये खर्च केल्याने महिलेने 6 वर्षाच्या भाचीच्या खासगी भागावर दिले गरम चमच्याने चटके)

प्राप्त माहितीनुसार, या मुलाला आई-वडिल नसल्याने तो आपल्या काकाकडे कांचनवाडी येथे राहत होता. या मुलाला त्याचे काका नेहमी शुल्लक कारणावरून मारहाण आणि शिवीगाळ करत असतं. मुलाने आपल्या खिशातून 50 रुपये घेतले असल्याचा आरोप करत काकाने पुतण्याला बेदम मारहाण करत गरम प्लेटचे चटके दिले. या प्रकारानंतर मुलाच्या घराजवळ राहणाऱ्या नागरिकांनी त्याचा एक व्हिडिओ बनवून तो सोशल मीडियावर व्हायरल केला. त्यानंतर पोलिसांनी या व्हिडिओची दखल घेत आरोपी काकाला ताब्यात घेत त्याच्यावर गुन्हा दाखल केला.

दरम्यान, मुंबईमध्ये कोंबडीचे यकृत खरेदी करण्याऐवजी चॉकलेटवर 10 रुपये खर्च केल्याने एका महिलेने 6 वर्षाच्या भाचीच्या खासगी भागावर गरम चमच्याने चटके दिल्याची घटना घडली होती. आरोपी महिलेने पीडित मुलीच्या तोंडात टॉवले भरवून मुलीचे हात बांधले आणि तिच्या खासगी भागावर गरम चमच्याने चटके दिले होते.