उत्तराखंडची राजधानी डेहराडूनमध्ये (Dehradun) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या ठिकाणी पोक्सो कोर्टाने एका आत्याला 20 वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. महिलेवर आरोप आहे की, तिने आपल्या 16 वर्षीय भाच्यासोबत जबरदस्तीने लैंगिक संबंध ठेवले आणि त्यातून ती गर्भवती राहिली. ही 30 वर्षांची सावत्र आत्या विवाहित आहे आणि 2 मुलांची आई आहे. पीडित मुलाच्या वडिलांची ती सावत्र बहीण आहे. फिर्यादी वकील अल्पना थापा यांनी सांगितले की, पॉक्सो कायद्यांतर्गत शिक्षा देण्याचा हा प्रकार उत्तराखंडमध्ये कदाचित प्रथमच घडला आहे व देशातील ही दुर्मिळ अशी घटना आहे.
रिपोर्टनुसार, महिलेचे तिच्या सावत्र भाच्यासोबत अनेक महिन्यांपासून शारीरिक संबंध होते. यानंतर ती गरोदर राहिली आणि तिने मुलाला जन्म दिला. महिला गरोदर असल्याची माहिती मिळाल्यानंतर, पीडित मुलाच्या आईने डेहराडूनच्या वसंत विहार पोलीस स्टेशनमध्ये 5 जुलै 2022 रोजी तिच्याविरुद्ध एफआयआर दाखल केला. त्यावेळी महिला आठ महिन्यांची गर्भवती होती.
मुलाच्या आईने महिलेवर आपल्या मुलाचे आयुष्य खराब केल्याचा आरोप केला होता. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला आणि 6 ऑक्टोबर 2022 रोजी महिलेविरुद्ध आरोपपत्र दाखल केले. महिलेने मुलाला जन्म दिल्यानंतर तिची फॉरेन्सिक तपासणी करण्यात आली होती. फिर्यादी पक्षाने कोर्टात फॉरेन्सिक लॅबचा अहवाल सादर केला, ज्यामध्ये 16 वर्षांचा मुलगा नवजात बाळाचा जैविक पिता असल्याची पुष्टी करण्यात आली आहे. (हेही वाचा: Jharkhand: झारखंडमध्ये दारूच्या नशेत एका व्यक्तीने पत्नी आणि दोन मुलींची केली हत्या)
पीडित मुलाच्या वडिलांच्या म्हणण्यानुसार, दोषी महिला भांडणानंतर पतीपासून वेगळी राहत होती. 2021 मध्ये ती तिच्या पतीपासून विभक्त झाली आणि वेगळ्या घरात राहत होती. आता अल्पवयीन मुलासोब जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप असलेल्या महिलेला कोर्टाने पॉक्सोच्या विविध कलमांतर्गत दोषी ठरवले आहे आणि तिला 10,000 रुपयांचा दंडही ठोठावला आहे. दोषी महिलेची तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे.