Goat प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

Thane: ठाणे जिल्ह्यातील कल्याण शिळफाटा (Kalyan-Shilphata) येथील बुधाजी चौक (Budhaji Chowk) परिसरात असलेल्या एका मटण शॉपची खीडकी तोडून 12 बोकडांची चोरी झाली आहे.  प्राप्त माहितीनुसार, मानपाडा येथील बुधाजी चौकातील दुकानात घडलेल्या या घटनेमध्ये दुकानदाराचे सुमारे 49, 000 रुपयांचे नुकसान झाले. दुकानदाराने दिलेल्या तक्रारीवरुन मानपाडा पोलिसांनी (Manpada Police)  अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. नववर्षाच्या स्वागताच्या (New Year Celebration) पार्श्वभूमीवर मिळालेल्या ऑर्डर पूर्ण करण्यासाठी आणलेले बोकड चोरीला जाताच दुकानदार हबकून गेला आहे.

मानपाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक शेखर बागडे यांनी प्रसारमाध्यमांना माहिती देताना सांगितले की, अदनान ख्वाजा कुरेशी हा 21 वर्षीय व्यक्ती भिवंडी येथील कोनगाव येथे राहतो. त्याने नववर्षाच्या मटण ऑर्डरसाठी 12 बोकड विकत आणले होते. हे सर्व बोकड त्याने मानपाडा येथील महाराष्ट्र मटण शॉपच्या (Maharashtra Mutton Shop) पाठिमागे असलेल्या बंद खोलीत ठेवले होते. दुकानाच्या मागील बाजूस असलेल्या खिडकीच्या लोखंडी सळ्या तोडून चोरट्यांनी दुकानात प्रवेश केला. (हेही वाचा - Goat Viral Video: बकरी सोबत सेल्फी घेणं महिलेला पडलं महागात; रागाच्या भरात शेळीने केला हल्ला, पहा व्हिडिओ)

दुकानातील विक्रेता आणि तक्रारदार अदनान याने म्हटले की, दुकानाच्या खिडकीजवळ टेम्पो उभ्या करून खिडकीतून चोरांनी बकऱ्या चोरून नेल्या. दुकानाजवळ अनेक सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. त्याच्या आधारे पोलिसांनी चोरट्यांचा शोध घ्यावा. दरम्यान, नववर्षानिमित्त आयोजित केल्या जाणाऱ्या पार्ट्यांमद्ये मटणाची ऑर्डर मोठी असते. यंदाची ऑर्डर आणि दरवर्षीचा अनुभव यांमुळे त्याने या वर्षी जरा अधिकच बोकड खरेदी केले होते. दरम्यान, आता त्याच बोकडांची चोरी झाली. आता मुद्देमालच चोरीस गेला. (हेही वाचा - Thane: भिवंडीत श्वास गुदमरून 65 शेळ्यांचा मृत्यू, दुकान मालकाचे 6 लाखांचे नुकसान)

पाठिमागच्या महिन्यापासून ग्राहकांनी अदनानकडे आगावू नोंदणी केली आहे. त्यामुळे आगोदरच झालेल्या नोंदणीनुसार अदनानने कच्चा माल म्हणजेच बोकड खरेदी केले होते. आता हे बोकड आणायचे तरी कुठून आणि इतक्या मोठ्या प्रमाणावर घेतलेली ऑर्डर पूर्ण करायची तरी कशी? असा सवाल अदनानसमोर निर्माण झाला आहे.