Thane: भिवंडीत श्वास गुदमरून 65 शेळ्यांचा मृत्यू, दुकान मालकाचे 6 लाखांचे नुकसान
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

ठाणे (Thane) जिल्ह्यातील भिवंडीमध्ये (Bhiwandi) गुदमरून 65 शेळ्यांचा (Goat) मृत्यू झाला आहे. भिवंडीत एका मटण दुकान मालकाने बकऱ्या एका खोलीत ठेवल्या, त्यामुळे त्यांचा गुदमरून मृत्यू झाला. गुरुवारी ही माहिती देताना एका अधिकाऱ्याने सांगितले की, भिवंडी शहरातील गुंदवली (Gundavali) भागातील एका मटणाच्या दुकानात बुधवारी ही घटना घडली. दुकान मालकाने 6 लाख रुपयांना 70 शेळ्या खरेदी करून मंगळवारी रात्री एका खोलीत ठेवल्या आणि बंद केल्या. त्यानंतर आजूबाजूच्या लोकांना दुसऱ्या दिवशी सकाळी बकऱ्यांचा मोठा आवाज ऐकू आला. ही बाब समजल्यानंतर खोली उघडली असता आतील दृश्य पाहून लोक थक्क झाले.

खोली उघडल्यानंतर एकाच वेळी 65 शेळ्या मृतावस्थेत आढळल्या. पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, घटनास्थळी पोहोचल्यानंतर दोन मृत बकऱ्यांचे नमुने पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले आहेत. शेळ्यांच्या शवविच्छेदन अहवालात त्यांचा मृत्यू गुदमरल्याने झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच काही नमुने अधिक माहितीसाठी पुण्याला पाठवण्यात आले आहेत. शेळ्यांना अस्वच्छ खोलीत ठेवण्यात आले होते. हेही वाचा Thane: ठाणेकरांना 500 चौरस फुटांपर्यंतच्या फ्लॅटसाठी मालमत्ता करात 31% सूट

दरम्यान, ठाणे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.जी जी चांदोर यांनी सांगितले की, शेळ्यांना एका अस्वच्छ खोलीत ठेवण्यात आले होते. ज्याचे एकच शटर होते, खोलीला योग्य वायुवीजन नव्हते. ते म्हणाले की, कोणत्याही रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून जिल्हा अधिकारी आता शेळ्यांच्या शवांची योग्य विल्हेवाट लावण्यावर लक्ष ठेवून आहेत, या घटनेची चौकशी केली जात आहे.