पोलिस असल्याचे सांगून हवालदाराच्या पत्नीसोबत फेसबुकवरून मैत्री करत तिलाच लाखोंचा गंडा घालणाऱ्या एका 33 वर्षीय महिलेला ठाणे येथील मानपाडा पोलिसांनी अटक केली आहे. फेसबुकवरील ओळख वाढवत या महिलेने हवालदाराच्या पत्नीशी मैत्री केली आणि त्यानंतर तिच्या घरात चोरी कली.
मुंबई मिररच्या वृत्तानुसार, अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव भक्ती शिंदे असे आहे. भक्तीने विदीशा वाघ या महिलेशी फेसबुकवर मैत्री केली. त्यानंतर तिचे घरी येणे-जाणे वाढू लागले. आणि एके दिवशी संधी साधत भक्तीने घरातील मोबाईल व दागिन्यांवर डल्ला मारला. चोरी लक्षात आल्यानंतर विदीशा यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली असून भक्तीला अटक करण्यात आली आहे. चोरी, घरफोडी अशा घटना घडूनही घरांच्या सुरक्षेत मुंबईकर देशात अव्वल!
विदीशा यांचे पती घाटकोपर पोलीस स्थानकामध्ये हवालदार पदावर कार्यरत आहेत. मुंबई मिररशी बोलताना विदीशा यांनी सांगितले की, भक्तीने मला ती पोलिस असल्याचे सांगितले. अनेक बड्या लोकांसोबतचे फोटोजही दाखवले. अनेकदा तिच्या बोलण्यात डोंबिवलीमधील राजकीय नेत्यांचा उल्लेख असायचा. त्यामुळे ती पोलिस आहे, यावर मी विश्वास ठेवला. इतकंच नाही तर ती थ्री स्टार ऑफिसर असून तिने मला पोलिसांचे ओळखपत्रही दाखवले होते. खाजगी कारणास्तव पोलिस दलातून काढून टाकल्याचे सांगत भक्तीने विदीशाच्या घरच्या फेऱ्या वाढवल्या. त्याचबरोबर विदीशा यांच्याकडून मिळणाऱ्या सहानभुतीचा फायदा घेत भक्तीने विदीशाच्या घरी चोरी केली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
विदीशा यांनी सांगितले की, 3 एप्रिलला भक्ती त्यांच्या घरी आली होती. त्यावेळी तिला घरात थांबायला सांगून मी किराणामाल घेण्यासाठी दुकानात गेले. त्यानंतर काही वेळाने भक्तीने माझ्या मुलीला मला बोलवून आणण्यास सांगून घराबाहेर पाठवले आणि संधी साधत मोबाईल आणि लाखो रुपयांचे दागिने चोरुन घरातून पळ काढला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भक्तीकडे पोलिसांचे खोटे ओळखपत्र सापडले आहे. अशाप्रकारे भक्तीने यापूर्वीही लोकांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. इतकंच नाही तर पोलिस असल्याचे सांगत तिने तीन वेळा लग्न केले आहे. तिच्या तिसऱ्या पतीने तिच्याविरोधात कोपरखैणे पोलीस स्थानकांमध्ये तक्रार नोंदवली आहे.