Thane: भीक मागण्यासाठी 3 वर्षांच्या मुलाचे अपहरण: पोलिसांनी 12 तासांत केली सुटका
Arrest | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

ठाण्यातील (Thane) कळवा पोलिसांनी (Kalwa police) एका 25 वर्षीय रिक्षाचालक (Auto-rickshaw Driver) महिलेला अटक केली आहे. 3 वर्षांच्या मुलाचे अपहरण (Kidnapped) केल्याप्रकरणी या महिलेला अटक करण्यात आली आहे. त्याचबरोबर या लहान मुलाची सुखरूप सुटका करण्यात पोलिसांना यश आले आहे. आरोपी महिला मुलाला भीक मागण्यास भाग पाडणार होती. तसंच तिचा लहान मुलांच्या तस्करीमध्ये (Child Trafficking) सुद्धा सहभाग आहे, असा पोलिसांना संशय आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

कळवा येथील प्रमिला सहकारी गृहनिर्माण संस्थेत राहणारा 3 वर्षीय ओम पटवा इमारतीच्या कंपाउंडमध्ये खेळत असताना त्याला अज्ञात व्यक्तीने पळवून नेले, अशी माहिती मुलाचे वडील भरतलाल पटवा यांनी पोलिसांनी दिली. या तक्रारीनुसार पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 363 अंतर्गत अपहरणाचा गुन्हा दाखल केला.

कोणताही सुगावा नसताना कळवा पोलिसांनी त्या अल्पवयीन मुलाचा शोध घेण्यासाठी तपास सुरू केला. घटनास्थळापासून खारेगाव एंट्री पॉईंटपर्यंत विविध सोसायट्या, इमारती आणि दुकानांतील सीसीटीव्ही फुटेजची छाननी करण्यात आली. (Dombivli Kidnapping Case: डोंबिवलीतून अपहरण केलेल्या 13 वर्षाच्या मुलीची सुटका, 21 वर्षीय तरूणाला अटक)

एका महिलेने ऑटोरिक्षामध्ये मुलाचे अपहरण केले आहे, हे आम्हाला सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे कळले. डिटेक्शन कर्मचाऱ्यांनी फुटेज तपासले आणि त्यांना आढळले की ऑटोरिक्षाचा क्रमांक MH 05 AQ 0120 असा आहे. ऑटोरिक्षाच्या तपशीलांच्या मदतीने टीम टिटवाळा येथे पोहचून महिलेला अटक केली आणि मुलाची सुटका केली, अशी माहिती कळवा पोलीस ठाण्यातील एका पोलीस अधिकाऱ्यानी दिली.

अटक केलेल्या महिलेचे नाव नूरजहाँ शब्बीर शेख (25) आहे. शेख ही एक ऑटो रिक्षाचालक आहे जी भाडेतत्वावर ऑटो चालवते. अपहरणानंतर 12 तासांच्या आत आम्ही महिलेला अटक केली आणि मुलाची सुटका केली. आरोपी महिलेला शुक्रवारी न्यायालयात हजर केले जाईल, असे कळवा पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मनोहर आव्हाड यांनी सांगितले.

तपासादरम्यान पोलिसांना संशय आहे की, मुलाची तस्करी करण्यासाठी आणि भीक मागण्यास भाग पाडण्यासाठी मुलाचे अपहरण केले गेले. आरोपी महिला 10 वर्षे कळव्यात राहायची आणि ती नुकतीच टिटवाळा येथे स्थलांतरित झाली होती. तिला कळवा परिसरात माहिती होती. म्हणून तिने ऑटो रिक्षा कळव्याला नेली. तिला बिल्डिंगच्या आवारात मूल खेळताना दिसले आणि तिने संधी साधली.