मुंबईच्या (Mumbai) शेजारी असणाऱ्या डोंबिवलीतून (Dombivli) अपहरण केलेल्या 13 वर्षाच्या मुलीची पोलिसांनी सुटका केली आहे. याप्रकरणी 21 वर्षीय तरूणाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. आरोपीने पीडित मुलीचे अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यासाठी भिवंडी (Bhiwandi) जिल्ह्यातील एका गावात घेऊन गेल्याचा त्याच्यावर आरोप आहे. त्याच्याविरोधात पोलिसांनी पॉक्सो (POCSO) कायद्यातंर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील चौकशीला सुरुवात केली आहे. या घटनेनंतर परिसरात चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 20 सप्टेंबर रोजी डोंबिवलीतील विष्णू नगर येथून संबंधित मुलीचे अपहरण करण्यात आले होते. दरम्यान, 23 सप्टेंबर रोजी मुलीची एका गावातून सुटका करण्यात आली आणि तिला तिच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले. याप्रकरणी अक्षय पाटील नावाच्या तरूणाला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याविरोधात बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण कायदा आणि भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे देखील वाचा- Bhiwandi Murder Case: भिवंडीमध्ये दारूसाठी पैसे न दिल्याने पत्नीला जिवंत पेटवले, पोलिसांनी पतीला केली अटक
काही दिवसांपूर्वी डोंबिवलीतील एका 15 वर्षीय मुलीवर 33 लोकांनी सुमारे आठ महिने बलात्कार केला होता. या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत 29 जणांना अटक केली आहे. तर, अन्य दोन अल्पवयीन आरोपींनाही ताब्यात घेतले आहे. इतर दोघे फरार आहेत. आरोपींनी पीडितेला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी वापरलेली ऑटोरिक्षा जप्त करण्यात आली आहे, असे एका अधिकाऱ्याने सांगितले आहे.