ठाणे (Thane) जिल्ह्यातील कल्याण (Kalyan) तालुक्यात असलेल्या मंलंगगड (Malang Gad) परिसरात दोन तरुणींना आणि त्यांच्या मित्रांना कपडे फाडूण मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार पुढे येत आहे. संस्कृती रक्षणाच्या नावाखाली काही टवाळखोर तरुणांनी या तरुणांना मारहाण केल्याचे समजते. तरुणींचे कपडे फाडणू त्यांना मारहाण करताना हुल्लडबाज तरुणांनी विनयभंग (Molest) करण्याचाही प्रयत्न केल्याचा आरोप आहे. प्राप्त माहितीनुसार, दोन तरुणी त्यांच्या मित्रांसोबत मलंगगड परिसरात पर्यटनास आल्या होत्या. या वेळी काही टवाळखोर तरुणांनी त्यांच्यासोबत गैरवर्तन केले. या धक्कादायक प्रकारानंतर मलंगगड परिसरातील सांस्कृतीक आणि समाजिक सुरक्षा प्रामुख्याने महिला सुरक्षा धोक्यात आली आहे की, काय असा सवाल उपस्थित केला जातो आहे. ही घटना रविवारी (1 ऑगस्ट) सायंकाळच्या सुमारास घडली.
घटनेबाबत माहिती अशी की, संबंधित युवक, यवती मलंगगडच्या पायथ्याशी फिरण्यासाठी गेले होते. या वेळी 6 ते 8 जणांचे एक टोळके तिथे होते. या टोळक्याने सुरुवातीला या तरुण तरुणींवर अश्लिल शेरेबाजी केली. त्यानंतर त्यांनी थेट संवाद साधत जाब विचारण्यास सुरुवात केली. यातून वादावादी सुरु झाली. नंतर या टोळक्याने तरुणींनी अत्यंत तोकडे कपडे का घातले असा आरोप करत थेट मारहाण करण्यास सुरुवात केली. दोन तरुणी आणि त्यांच्ये दोन मित्र अशा चौघांना या टोळक्याकडून बेदम मारहाण करण्यात आली. हे टोळके इतक्यावरच थांबले नाही. तर , या टोळक्याने तरुणींच्या कपड्याला हात घातला. ते फाडले आणि विनयभंग करण्याचाही प्रयत्न केला.
दरम्यान, टवाळखोर तरुणांच्या तावडीतून कशीबशी सुटका करत पीडित युवक-युवतींनी नजिक असलेले नेवाळी पोलीस स्टेशन गठले. तिथे जाऊन त्यांनी तक्रार देण्याचा प्रयत्न केला. परंतू, पोलिसांनी तत्काळ तक्रार दाखल करुन घेण्यास टाळाटाळ केली. तसेच, प्रथम मेडीकल करुन या अशी उडवाउडवीची उत्तरेही दिल्याचा आरोप पीडितांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला आहे. शिवाय पोलिसांनी इथे तुमची तक्रार दाखल होणार नाही. तुम्ही हिल लाईन पोलीस स्टेशनला जा असा सल्लाही पोलिसांकडून देण्यात आला. शेवटी याघटनेतील पीडित तरुणीने सोशल मीडियावर घडला प्रकार शेअर केला आणि त्यानंतर या घटनेला वाचा फुटली. पोलिसांनी मंगळवारी (3 ऑगस्ट) सायंकाळी घटनेबाबत गुन्हा दाखल करुन घेतला आणि आरोपींचा शोधही सुरु केला.