TET Exam Scam: टीईटी परीक्षा घोटाळ्यात पुणे सायबर पोलिसांची मोठी कारवाई; सनदी अधिकारी सुशील खोडवेकर यांना अटक
Arrest | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या टीईटी परीक्षा घोटाळा (TET Exam Scam) प्रकरणी पुणे सायबर (Pune Cyber Police) पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पुणे सायबर पोलिसांनी कृषी विभागातील अधिकारी सुशील खोडवेकर (Sushil Khodwekar) यांना अटक करण्यात आली आहे. त्यांना पुणे येथील शिवाजी नगर कोर्टासमोर हजर करण्यात येत आहे. खोडवेकर यांना ठाणे येथून अटक करण्यात आली. शिक्षक भरती परीक्षा घोटाळ्याची सूत्रे खोडवेकर यांच्यापर्यंत पोहोचल्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई झाली. या प्रकरणा सायबर पोलिसांनी आगोदरच काही लोकांना अटक केली आहे. मात्र, या प्रकरणात आयएएस अधिकाऱ्याला अटक झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

सुशील खोडवेकर यांच्या अटकेमुळे हे प्रकरण आता कुठेपर्यंत पोहोचणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. पोलिसांनी झालेल्या कारवाईबद्दल अद्याप सविस्तर माहिती दिली नाही. मात्र, या प्रकरणाची दाहकता विचारात घेता आणखी बडे मासे गळाला लागणार असल्याची शक्यता आहे. सुशील खोडवेकर हे 2009 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागात उपसचिव म्हणून पदभार सांभाळत होते. शिक्षक भरती घोटाळा पुढे आल्यानंतर पुणे सायबर पोलिसांनी त्याची पाळमुळं खोदण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई असून, एखाद्या आयएएस दर्जाच्या अधिकाऱ्यास अटक होण्याची ही अपवादात्मक घटना आहे. (हेही वाचा, Maha TET Exam Scam: शिक्षक पात्रता परीक्षा घोटाळा प्रकरणामध्ये पुणे पोलिसांकडून अटकसत्र सुरूच)

पुणे सायबर पोलिसांनी याच प्रकरणात तुकाराम सुपे यांच्या कार्यालयीन वाहनावरील चालक सुनील घोलप याला अटक केली आहे. त्याच्यासोबतच मनोज शिवाजी डोंगरे यासही या प्रकरणात अटक झाली आहे. घोलप याने शिक्षक भरती पात्रता परीक्षा 2020 मध्ये इतर आरोपींशी संगणमत साधले आणि अपात्र विद्यार्थ्यांना कोट्यवधी रुपयांच्या बदल्यात पात्र करवून घेण्याचे काम केले. पुणे पोलिसांना चौकशीतून प्राप्त माहितीनुसार, सुपे हा त्याच्याकडे आलेल्या विद्यार्थ्यांची नावे, त्यांचे हॉल तिकीट घोलप याच्या व्हॉट्स अपवर पाठवत असायचा. त्यानंतर घोलपद्वारे ती सर्व सामग्री इतर आरोपींपर्यंत पोहोचवली जायची. या प्रकरणात आतापर्यंत 40 जणांना अटक करण्यात आली आहे. ही करवाई पुढेही चालू राहणार आहे.