Gateway Of India Mumbai | Image Used For Representative Purpose | (Photo Credits: unsplash.com)

सीआरपीएफ मुंबई मुख्यालयात (CRPF Mumbai Headquarters) एक धमकीचा ईमेल आला आहे. या ईमेलमध्ये सार्वजनिक ठिकाणं, मंदिर आणि विमानतळ आदी ठिकाणांवर मोठ्या प्रमाणावर बॉम्बस्फोट करण्यात येणार असल्याची धमकी देण्यात आल्याचे वृत्त आहे. सूत्रांच्या हवाल्याने प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, हा ई-मेल 4 ते 5 दिवसांपूर्वी आला होता. सीआरपीएफच्या (CRPF ) धमकी व्यवस्थापन प्रणालीकडून हा मेल राष्ट्रीय अन्वेषण एजन्सी (National Investigation Agency) कडे पाठविण्यात आला आहे. सीआरपीएफला मिळालेल्या मेलमध्ये म्हटले आहे की, भारतात लश्कर ए तैयबा (Lashkar-e-Taiba) ​या दहशतवादी संघटनांचे दहशतवादी दबा धरुन बसले आहे. तीन राज्यांमध्ये सुमारे 200 किलो ग्रॅम हाय ग्रेड RDX पुरविण्यात आल्याचा दावाही या मेलमध्ये करण्यात आला आहे. सूत्रांनी म्हटले आहे की, 11 पेक्षा जास्त दहशतवादी आणि आत्मघातकी हल्लेखोर दबा धरुण बसल्याचा उल्लेखही या ई-मेलमध्ये करण्यात आला आहे.

दरम्यान, ईमेलमध्ये जोडलेल्या पत्रात म्हटले आहे की, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचया जीवाला धोका आहे. ईमेलच्या शेवटी ईमेल पाठविणाऱ्याने म्हटले आहे की, ''आम्ही अज्ञात आहोत. आम्ही एक आर्मी आहोत. आम्ही माफ करत नाही. आम्ही विसरत नाही. आमची वाट पाहा''. या मेलनंतर तपास यंत्रणा संपूर्ण ताकदीनिसी मेलचा स्त्रोत शोधत आहेत. तसेच, ईमेलची सत्यताही पडताळत आहेत. (हेही वाचा, Sukma Naxal Attack: नक्षलवादी हल्यातील शहीद जवानांसह मृतांची संख्या 22 वर पोहोचली, 'त्या' बेपत्ता 14 जणांचे मृतदेह सापडले)

गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात NIA कंट्रोल रुममध्ये अशाच प्रकारचा एक फोन कॉल आला होता. कॉल करणाऱ्या व्यक्तीन पाकिस्तानच्या कराची येथून फोन करत दावा केला होता आणि मुंबई पोर्ट आणि पोलीस एस्टेब्लिशमेंट वर हल्ला करण्याचा कट जैश रजत असल्याचे म्हटले होते. या फोनकॉलचाही तपास सुरु आहे.