
Aurangabad: बँकेच्या परीक्षेसाठी आलेल्या अहमदनगर (Ahmednagar) च्या तरुणाचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. औरंगाबाद महापालिकेच्या मुख्यालयाशेजारील कब्रस्तान परिसरात या तरुणाचा मृतदेह आढळला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताचं पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. विकास चव्हाण असं या संशयास्पद मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे. विकास हा अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील रहिवाशी आहे.
प्राप्त माहितीनुसार, आज औरंगाबाद महापालिका मुख्यालयाशेजारील कब्रस्तान परिसरात एका तरुणाचा मृतदेह सापडला. या घटनेची माहिती मिळताचं स्थानिक नागरिकांनी परिसरात गर्दी केली. तसेच काहीवेळातचं पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करत तरुणाचा मृतदेह ताब्यात घेतला. (वाचा - Satara मध्ये 3 चिमुकल्या बहिणींना विषबाधा; तीन दिवसांत तिघांचाही संशयास्पद मृत्यू)
दरम्यान, यावेळी पोलिसांना तरुणाच्या मृतदेहाजवळ काही कागदपत्रे आढळून आली. या कागदपत्रावरून मृत तरुणाचे नाव विकास चव्हाण असल्याचं स्पष्ट झालं. प्राथमिक अंदाजानुसार, विकास बँकेच्या परीक्षेसाठी औरंगाबादला आला होता. मात्र, त्याचा संशसास्पद मृत्यू झाला. अद्याप विकासच्या मृत्यूचं कारण समजू शकलेलं नाही.
पोलिसांनी तरुणाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी घाटी रुग्णालयात पाठवला आहे. प्राथमिक अंदाजानुसार, विकासला मारहाण करण्यात आली. यात तो रक्तबंबाळ झाला. पोलिस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.