राजकारणात अनेक प्रसिद्ध कुटुंब आहेत- गांधी, पवार, ठाकरे. परंतु त्यातील सध्या चर्चेत असलेलं कुटुंब म्हणजे पवार कुटुंब. शरद पवार यांच्या आधी त्यांच्या आई देखील राजकारणात होत्या परंतु शरद पवारांनी कुटुंबातील राजकारणातील वारसा जेवढा जपला तेवढाच वाढवला देखील होता. असं असूनही आता मात्र पवार कुटुंबही राजकारणात बळी पडलं की काय असा प्रश्न साऱ्यांनाच पडतोय.
शरद पवार यांचे पुतणे अजित पवार यांच्या एका पाऊलामुळे पवार कुटुंब विभागलं गेल्याचं दिसून येत आहे. अजित पवार यांना शरद पवारांचा राजकारणातील वारसदार म्हणून ओळखले जाते. पण तेच त्यांना न विचारता थेट भाजपशी जाऊन हातमिळवणी करतात ते ही उपमुख्यमंत्री पदासाठी तेव्हा शरद पवार यांची पुढील चाल काय असणार हे बघणं महत्त्वाचं ठरेल.
या आधीही अजित पवार अनेकदा पक्षातील काही गोष्टींवर आणि काही माणसांवर नाराज झाले आहेत. परंतु माध्यमांशी बोलताना मात्र त्यांनी प्रत्येक वेळा, शरद पवार यांचंच शब्द पवार घराण्यात फायनल असल्याचे सांगितले आहे.
अजित पवार यांची एकंदर वागणूक पाहता राजकीय विश्लेषक प्रकाश पवार यांनी बीबीसी मराठीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे की, "अजित पवार यांच्या कृती अविवेकी आहेत, त्या अनेकदा शरद पवारांना पटत नाहीत. त्यांनी वेळोवेळी घेतलेल्या निर्णयातून ते दिसून आलंय. 2004 नंतर अजित पवारांनी राष्ट्रवादीत स्कॉर्पिओ कल्चर आणलं, असा त्यांच्यावर आरोप होत होता. त्यामुळेच शरद पवारांना अजित पवार यांच्यापेक्षा सुप्रियाच वारसदार ठरतील, असं पवारांना वाटत असावं."
अशा परिस्थितीत शरद पवार यांचा राजकारणातील वारसदार पुढे कोण असा प्रश्न विचारला जात असताना, सोशल मीडियावर मात्र सुप्रिया सुळे यांचीच चर्चा दिसून येते. सुप्रिया सुळे या राजकारणात सक्रियच नाही तर त्या तितक्या चातुर्याने आणि संयंमी पणाने सर्व प्रश्न हाताळतात. तसेच अजित पवार यांची पक्षातून हकालपट्टी झालीच तर या पुढे सुप्रिया सुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात शरद पवार यांचा वारसा चालवतील का हे बघणं महत्त्वाचं ठरेल