Maharashtra Politics News: उन्हाचा पारा चढला, सोबतच राज्यातील राजकीय वातावरणही तापले; सुप्रीया सुळे, सुनेत्रा पवार, उदयनराजे भोसले भरणार उमेदवारी अर्ज
Supriya Sule And Sunetra Pawar | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

राज्यातील बारामती (Baramati Lok Sabha Constituency) आणि सातारा (Satara, Satara Lok Sabha Constituency) हे दोन्ही लोकसभा मतदारसंघ आज (18 एप्रिल) प्रचंड चर्चेत आहे. बारामती येथून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सुप्रिया सुळे (Supriya Sule) तर अजित पवार यांच्या पक्षाकडून सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत. दुसऱ्या बाजूला सातारा लोकसभा मतदारसंघातून उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) हे भाजपच्या तिकीटावर अर्ज दाखल करत आहे. दोन्ही मतदारसंघ राजकीयदृष्टा कामालीचे महत्त्वाचे आहेत. त्यामुळे तिन्ही उमेदवार जोरदार शक्तीप्रदर्शन करणार हे निश्चित आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण कमालीचे तापल्याचे पाहायला मिळत आहे. दुसऱ्या बाजूला उन्हाळा असल्याने तापमानाचा पाराही चढाच आहे. असे असले तरी आपल्या नेत्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी कार्यकर्ते उन्हातान्हात दाखल होत आहेत.

अजित पवार यांची पत्नी सुनेत्रा यांच्यासोबत आरती

लोकसभा उमेदवारीअर्ज दाखल करण्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांनी पत्नी सुनेत्रा पवार यांच्यासोबत पुणे येथील प्रसिद्ध श्रीमंत दगडूशेट गणपती मंदिरात आरती केली. या वेळी आपण यश येऊ दे.. मोठा विजय होऊ दे यासाठी गणरायाला साकडे घातल्याचे सुनेत्रा यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले. तर निवडणुका निकोप वातावरणात पार पडाव्यात यासाठी गणपतीचे आशीर्वाद घेतल्याचे अजित पवार म्हणाले. आजवर गणरायाने मला बरेच काही दिले आहे. गणरायाने सर्वांचे भले करावे, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली. (हेही वाचा, अजित पवार यांची पत्नी सुनेत्रा यांच्यासह श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात प्रार्थना)

जनता माझ्या पाठीशी उभी राहील- सुप्रिया सुळे

शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस (NCP-SP) पक्षाच्या उमेदवार सुप्रिया सुळे या देखील आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत. याबाबत विचारले असता त्या म्हणाल्या, आज मी उमेदवारी अर्ज दाखल करत आहे. बारामतीच्या जनतेला मी केलेले काम माहिती आहे. त्यामुळे ही जनता माझ्या पाठीशी नक्की उभा राहिल, असा विश्वास मला वाटतो. मला लोकांसाठी आणखी काम करायचे आहे. त्यासाठी मला जनतेची साथ हवी आहे. मला माहिती आहे, बारामती लोकसभा मतदारसंघातील बराचसा भाग दुष्काळी आहे. त्यामुळे इथे पाण्याची समस्या खूपच मोठी आहे. प्रशासनाने त्याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. या जनतेसाठी आपण काम करत असल्याचेही सुप्रिया सुळे म्हणाल्या. (हेही वाचा, Lok Sabha Election 2024 : लोकसभेचा हाय होल्टेज ड्रामा! बारामतीत सुप्रिया सुळे यांना मोठा धक्का; सुळे यांचे प्रचारप्रमुख सुनेत्रा पवारांचा प्रचार करणार)

व्हिडिओ

उदयनराजे भोसले यांचे शक्तीप्रदर्शन

सातारा लोकसभा मतदारसंघ हा पाठिमागील अनेक दिवसांपासून चर्चेत होता. महाविकासआघाडीच्या जागावाटपात हा मतदारसंघ शरद पवार यांच्या पक्षाला आला आहे. या ठिकाणी श्रीनावस पाटील यांनी पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उभा राहण्यासाठी प्रकृतीच्या कारणास्तव नकार दिला. त्यामुळे पवार यांनी येथे शशिकांत शिंदे यांना उमेदवारी दिली आहे. दुसऱ्या बाजूला भाजपही कोणास उमेदवारी द्यावी यासाठी विचारमंथन करत होते. तर उदयनराजे भोसले यांनी आपली दावेदारी कायम ठेवली होती. त्यामुळे प्रदीर्घ काळ होऊनही भाजपने याठिकाणी उमेदवारी जाहीर केली नव्हती. अखेरच्या टप्प्यात येथे उदयनराजे भोसले यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. हेच उदयनराजे भोसले आता भाजपच्या तिकीटावर अधिकृत उमेदवार असणार आहेत. मोठे शक्तीप्रदर्शन करत ते आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री शंभूराज देसाई, माजी मंत्री सदाभाऊ खोत, आमदार शिवेंद्रराजे भोसले, मकरंद पाटील, जयकुमार गोरे, कृष्णा खोरे महामंडळाचे उपाध्यक्ष महेश शिंदे, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर, भाजपचे लोकसभा समन्वयक अतुल भोसले, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष पुरूषोत्तम जाधव अशी बरीच मंडळी आणि कार्यकर्ते उपस्थित राहमार असल्याचे समजते.