देशात महिला आणि मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना थांबायला तयार नाहीत. देशातील विविध कोपऱ्यातून दररोज हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटना समोर येत आहेत. अशातच बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यातील बेलगाव येथील एका विवाहितेने सासरच्या छळाला वैतागून आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली आहे. याप्रकरणी संबंधित महिलेच्या पतीसह सासरच्या 5 जणांविरोधात स्थानिक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पोलीस पुढील तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत महिलेचे काही वर्षांपूर्वी बेलगाव येथील गजानन वानखेडे नावाच्या व्यक्तीसह लग्न झाले होते. या महिलेच्या सासरच्या लोकांना जेसीबी घ्यायचा होता. यासाठी सासरच्या लोकांनी त्यांनी तिच्याकडे माहेरवरून 10 लाख रुपये आणण्यासाठी तगादा लावला होता. एवढेच नव्हेतर, तिला शारीरिक आणि मानसिक त्रासही दिला जात होता. यामुळे सासरच्या कंटाळून या महिलेने गळफास लावून आत्महत्या केली. या घटनेनंतर आजूबाजुच्या परिसरात संतापजनक वातावरण निर्माण झाले आहे. हे देखील वाचा- Malad: लूडो खेळात वारंवार पराभूत झाल्याच्या रागातून मित्राची हत्या, बोगस प्रमाणपत्र बनवून अंत्यसंस्कारही उरकले
याप्रकरणी मृत महिलेच्या वडिलांनी स्थानिक पोलीस ठाण्यात जाऊन तिच्या सासरच्या लोकांविरोधात तक्रार दिली. त्यानुसार, संबंधित महिलेचा पती गजानन वानखेडे, त्याचे आईवडील बालाजी वानखेडे व मंदोदरी वानखेडे यांच्यासह मनिषा रामेश्वर बोडखे आणि अश्विनी सोमेश बाजड यांच्याविरोधात गुन्हे दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात न्युज 18 लोकमतने माहिती दिली आहे.