Atal Setu Mumbai | X

मुंबई आणि नवी मुंबईला जोडणारा समुद्री पूल ‘अटल सेतू’ (Atal Setu) हा, अलीकडच्या काळात आत्महत्यांच्या घटनांमुळे चर्चेत आला आहे. ऑक्टोबर 2024 मध्ये, दोन दिवसांच्या अंतराने दोन व्यक्तींनी या पुलावरून उडी मारून आत्महत्या केल्या. आता शुक्रवारी सकाळी अटल सेतू पुलावरून उडी मारून अजून एका व्यक्तीने आत्महत्या केल्याची घटना समोर अली आहे.  वैभव पिंगळे असे या व्यक्तीचे नाव असून ते अलिबाग येथील रहिवासी होते. पिंगळे यांनी सेक्सटॉर्शनमुळे हे टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगण्यात येत आहे. ते पनवेल तालुक्यातील कुर्डुस गावातील जिल्हा परिषद शाळेतील प्राथमिक शाळेतील शिक्षक होते व  सेक्सटॉर्शनचा बळी ठरल्याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी पोलिसांना दिली. पिंगळे यांच्या कुटुंबाला सेक्सटॉर्शनची माहिती होती. त्यांचे दूरचे नातेवाईक पोलीस विभागात होते, ज्यांनी त्यांना काळजी न करता औपचारिक पोलीस तक्रार दाखल करण्यास सांगितले होते. समाजात बदनामीची भीती असल्याने त्यांनी गुन्हा नोंदवू दिला नाही.

याआधी ते पोयनाड पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यासाठी गेले होते, मात्र तक्रार न करताच निघून गेले, असे उलवे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्जुन राजणे यांनी सांगितले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंगळे सकाळी 7.30 वाजता कुटुंबाला जास्त काही माहिती न देता घराबाहेर पडले. ते मोबाईल फोन घरीच सोडून चिरनेरमार्गे अटल सेतू पुलापर्यंत गेले. पुढे जवळजवळ 9 किलोमीटर गाडी चालवल्यानंतर त्यांनी गाडी पार्क केली आणि लगेचच पुलावरून उडी मारली.

सहाय्यक पोलीस आयुक्त (बंदर विभाग) विशाल नेहुल यांनी सांगितले की, अटल सेतू पुलावरून आत्महत्येची ही या वर्षातील पहिली घटना आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात गाडी पार्क केलेली कैद झाली होती, मात्र तिथे कोणी पोहोचू शकेल, तोपर्यंत पिंगळे यांनी उडी मारली होती. पिंगळे यांच्या कुटुंबाने उलवे पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, पिंगळे यांनी सायबर बुलीला आधीच 12,000 रुपये आणि 6,000 रुपये दिले होते. त्यांनी बर ब्लॉक केले होते, मात्र तरीही त्यांना गवेगळ्या नंबरवरून खंडणीची रक्कम मागणारे कॉल येत राहिले. (हेही वाचा: Boy Drowns In Water Tank In Thane: नातेवाईकाच्या घरी गेला आणि जीव गमवून बसला! इमारतीच्या पाण्याच्या टाकीत पडून 3 वर्षीय चिमुरड्याचा मृत्यू)

सायबर आरोपीकडे पिंगळेच्या संपर्क यादीची माहिती होती आणि तो वेगवेगळ्या लोकांकडून कर्ज घेण्यासाठी त्यांना ब्लॅकमेल करत होता. पिंगळे यांनी एक नवीन फोन खरेदी केला होता, जो कारमध्ये सीलबंद बॉक्समध्ये सापडला. पोलिसांनी वापरलेल्या कारच्या नोंदणी क्रमांकाच्या मदतीने पिंगळे यांची ओळख पटवली आणि त्यांच्या कुटुंबियांना घटनेची माहिती दिली. दरम्यान, समुद्रात पिंगळे यांचा शोध अजूनही सुरू आहे. पिंगळे यांचा शोध घेत असताना पोलिसांना आणखी एका पुरूषाचा मृतदेह सापडला. हा मृतदेह सुमारे तीन दिवस जुना असल्याचे दिसते आणि त्याची ओळख पटलेली नाही, असे पोलिसांनी सांगितले.