सांगलित उसदर आंदोलनाचा भडका (संग्रहित प्रतिमा)

स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि शेतकऱ्यांनी पश्चिम महाराष्ट्रात सुरु केलेले ऊस दर आंदोलन हिंसक वळण घेताना पहायला मिळत आहे. आंदोलकांनी सांगली येथे विविध ठिकाणी जाळपोळ केल्याचे तर, इस्लामपुर परिसरातील कामेरी गावातील राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखाण्याचे कार्यालय जाळल्याचे वृत्त आहे. आंदोलक आक्रमक झाले असून, त्यांनी काही ठिकाणी दगडफेक केली तर, काही ठिकाणी तोडफोड आणि जाळपोळ केल्याचे वृत्त आहे. ऊसाला एफआरपी अधिक दोनशे रुपये दर मिळावा अशी स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह अनेक शेतकऱ्यांची मागणी आहे. याच मुद्द्यावर आंदोलन सुरु आहे.

दरम्यान, ऊस दराच्या मुद्द्यावरुन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खा. राजू शेट्टी यांनी सरकारवर काही दिवसांपूर्वी निशाणा साधला होता. या वेळी बोलताना, 'ऊस दराचा तिढा सोढविण्यासाठी दिल्लीला जायची हिंमत मुख्यमंत्र्यांना का होत नाही. येत्या काही दिवसांत ऊस दराचा तिडा सुटला नाही तर, येत्या 11 नोव्हेंबरला ऊस पठ्ठ्यात चक्काजाम आंदोलन करु आणि कडकडी बंदही पाळू', असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला होता. तसेच, 'राज्यात पुन्हा एकदा 2013 सारखा उद्रेक होईल आणि त्याला सरकार जबाबदार असेल', असेही शेट्टी यांनी म्हटले होते. (हेही वाचा, शिरोळ नगरपरिषद निवडणूक निकाल; भाजपला फटका, राजू शेट्टींच्या शाहू आघाडीचा विजय)

दरम्यान, ऊस तोडणी करण्यास ऊसतोड कामगारांचाही नकार आहे. पण, कारखानदार शेतकरी आणि ऊस दर आंदोलकांना शह देण्यासाठी ऊस तोडणी कामगारांवर दबाव टाकून त्यांना काम करण्यात प्रवृत्त करत आहेत. कारखानदारांच्या या वागण्यामुळेच आंदोलक भडकल्याचा आरोप राजू शेट्टी यांनी केला आहे.