खा. राजू शेट्टी (संग्रहित, संपादित प्रतिमा)

शिरोळ नगरपरिषदेसाठी झालेल्या पहिल्यावहिल्या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी- स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राजर्षि शाहू आघाडीने बाजी मारत क्रमांक एकचे स्थान मिळवले आहे. तर, भाजपला दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले आहे. नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत राजर्षि शाहू आघाडीचे अमरसिंह पाटील विजयी झाले असून, त्यांनी ३३ मतांनी आघाडी घेतली.

दरम्यान, १७ नगरसेवक पदासाठी ८३ उमेदवार रिंगणात होते. त्यापैकी, राजर्षि शाहू आघाडीला ९ तर, भाजपला ७ जागा मिळाल्या. एका ठिकाणी अपक्ष उमेदवार विजयी झाला. आठ प्रभागांमध्ये सरासरी ८० टक्के मतदान पार पडले. तर, एकूण २१ हजार ७३१ मतदारांपैकी १७ हजार ३६७ मतदारांनी मतदान केले. यात ८ हजार २४४ महिला आणि ९ हजार १२३ पुरुषांनी मतदान केल्याची नोंद झाली. शाब्दिक बाचाबाचीचे काही प्रकार वगळता मतदान शांतते पार पडले. (हेही वाचा, शिरोळ नगरपरिषद निवडणूक 2018: पहिला निकाल हाती)

दरम्यान, जिल्ह्यातील राजकारण बऱ्यापैकी शिरोळभोवती फिरत असल्यामुळे या निवडणुकीत अनेक दिग्गज राजकीय नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. तर, भाजप, बहुजन विकास आघाडी, शाहू आघाडी, ताराराणी आघाडी असे विविध पक्ष आणि आघाड्या यांच्यासोबतच अपक्षही मैदनात उतरल्याने मतदार राजा कोणाला कौल देतो याबाबत उत्सुकता होती. मात्र, मतदारांनी शाहू आघाडीच्या पारड्यात कौल दिल्याने शिरोळमध्ये खा. राजू शेट्टीच प्रभावी असल्याचे सिद्ध झाले आहे.