महाराष्ट्रात कोरोना बाधितांची संख्या दिवसागणिक वाढू लागल्याने महाराष्ट्रात नाईट कर्फ्यू (Night Curfew) घोषित करण्यात आला आहे. त्याचबरोबर प्रत्येक जिल्ह्याने आपल्या शहरातील कोरोनाची स्थिती पाहता त्यानुसार, कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. दरम्यान पालघर (Palghar) जिल्ह्यात 5 एप्रिलपासून कडक निर्बंध (Corona Strict Rules) घालण्यात आले आहेत. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांनी जिल्ह्यातील वसई-विरार महानगरपालिका क्षेत्र वगळून निर्बंध लागू केले आहेत.
पालघर जिल्ह्यातील कोरोनाच्या नव्या नियमानुसार, सर्व शाळा-महाविद्यालय, कोचिंग क्लासेस पुढील आदेशापर्यंत पूर्णपणे बंद राहतील. दहावी व बारावीतील मुलांच्या पालकांच्या संमतीने ऐच्छिक वर्ग घेता येतील. राज्य, राष्ट्रीय व विद्यापीठ स्तरावरील परीक्षा मार्गदर्शक सूचनांचे पालन करून घेण्याची परवानगी राहील. अत्यावश्यक सेवा, जीवनावश्यक वस्तू वगळता सर्व दुकाने सकाळी 7 ते सायंकाळी 7 पर्यंत सुरू राहतील.हेदेखील वाचा- Coronavirus: कल्याण-डोंबिवलीमध्ये आजपासून विकेंड्सला निर्बंध लागू; पहा काय बंद-सुरु राहणार
त्याचबरोबर पालघर जिल्ह्यात लग्न व इतर समारंभ 15 एप्रिलपर्यंत पूर्वनियोजित असल्यास स्थानिक स्वराज्य संस्था व पोलीस ठाण्याकडून परवानगी घेण्याचे बंधनकारक राहील. कार्यक्रम सकाळी 7 ते सायंकाळी 7 या वेळेत घेण्यास परवानगी राहील. नंतर समारंभांच्या आयोजनास पुढील आदेशापर्यंत बंदी राहील. खाद्यगृह, परमिट रूम, बार ही सकाळी 7 ते रात्री 9, घरपोच खाद्यसेवा व वितरण कक्ष रात्री 10 तर व्यायामशाळा, क्रीडा संकुल, खेळाची मैदान आदी वैयक्तिक सरावासाठी सुरू असतील.
भाजी मंडई 50% क्षमतेने सुरू राहतील. दिवसाआड रिक्षा, सिनेमागृह, हॉटेल, उपाहारगृहात पन्नास टक्के उपस्थिती, असे आदेशित करण्यात आले आहे. शॉपिंग मॉल सकाळी 7 ते सायंकाळी 7 पर्यंत सुरू होतील. अंत्यविधी कार्यक्रमास 20 पेक्षा अधिक व्यक्ती उपस्थित राहता कामा नये, असे सूचित करण्यात आले आहे.
महाराष्ट्रात काल (26 मार्च) दिवसभरात 36,902 जणांना कोरोना संसर्ग झाला. तर , 17,019 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. राज्यात आज 112 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. यामुळे कोरोना बाधितांची एकूण संख्या 26,37,735 वर पोहोचली आहे.