Political Parties in Maharashtra (File Photo)

महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या (Local Body Election)  निवडणुकांमध्ये झालेल्या खर्चाचा तपशील न दिल्याने राज्य निवडणूक (Maharashtra State Election Commission) आयोगाने शिवसेना, कॉग्रेस, भाजपासह 14 मान्यताप्राप्त राजकीय पक्षांना नोटीस बजावली आहे. या नोटीसमध्ये 10 मार्च 2019 पर्यंत संबंधित पक्षांनी खर्चाचा तपशील सादर करावा अशा सूचना दिल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज.स.सहारिया (J.S.Saharia) यांनी दिली आहे.

राज्य निवडणूक आयोगच्या 15 ऑक्टोबर 2016 च्या आदेशान्वये राजकीय पक्षांना निवडणूकीचा खर्च सादर करणं बंधनकारक आहे. राजकीय पक्षांना ही माहिती असूनादेखील संबंधित तपशील वेळेत सादर न झाल्याने पक्षांची नोंदणी का रद्द केली जाऊ नये? अशी नोटीस राज्य निवडणूक आयोगाने बजावली आहे.

कोणकोणत्या पक्षांना देण्यात आली नोटीस?

भारतीय कम्युनिस्ट पक्ष, शिवसेना, भारतीय जनता पार्टी, नॅशनलिस्ट कॉंग्रेस पार्टी, भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, जनता दल, समाजवादी पार्टी, ऑल इंडिया अण्णा द्रविड मुन्नेत्रम कझगम, लोकजनशक्ती पार्टी, ऑल इंडिया मजलिस इत्तेहदूल मुस्लिमीन, जनता दल, बहुजन समाज पार्टी, कम्युनिस्ट पक्ष या पक्षांचा समावेश आहे.

लवकरच भारतामध्ये आगामी लोकसभा निवडणूकांच्या तारखा जाहीर होणार आहेत. महाराष्ट्रामध्ये लोकसभेपाठोपाठ विधानसभा निवडणूकादेखील होणार आहेत.