ST Bus (Photo Credits: Twitter)

दिवाळीनिमित्त एसटी महामंडळात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना भेट देण्यात येते. तर यावेळी 1 लाखांपेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना दिवाळी गिफ्ट मिळणार असल्याची घोषणा परिवहन मंत्री दिवाकर रावते (Diwakar Raote) यांनी घोषणा केली आहे. त्यानुसार कर्मचाऱ्यांना 2500 रुपये आणि अधिकाऱ्यांना 5 हजार रुपये रक्कम दिवाळी गिफ्ट म्हणून देण्यात येणार आहे.

महाराष्ट्रात नुकत्याच निवडणूका पार पडल्या तरीही आचारसंहिता कायम आहे. त्यामुळे दिवाळी गिफ्ट बाबतचा प्रस्ताव निवडणूक आयोगाकडे पाठवण्यात आला आहे. यावर निवडणूक आयोगाकडून हिरवा कंदील दाखवल्यानंतरच कर्मचाऱ्यांना हे दिवाळी गिफ्ट मिळणार आहे. तर जळगाव मधील अमळनेर मधील वाहक मनोहर पाटील यांनी प्रत्येक वर्षाप्रमाण या वेळी सुद्धा कर्मचाऱ्यांना दिवाळी गिफ्ट देण्यात यावे अशी विनंती केली होती. त्यानुसार रावते यांनी कर्मचाऱ्यांना दिवाळीच्या पार्श्वभुमीवर आनंदाची बातमी देण्याचे ठरवत कर्मचाऱ्यांना वेतनाव्यतिरिक्त अधिक पैसे देणार असल्याचे जाहीर केले आहे.

त्याचसोबत दिवाळीसाठी जादा एसटी बसची सोय महामंडळाकडून करण्यात आली आहे. 24 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर दरम्यान राज्याच्या विविध ठिकाणाहून जवळजवळ 3500 बस सोडण्यात येणार आहेत.त्याचसोबत स्थानिक स्तरावर सुद्धा आवश्यकतेनुसार जादा बसची सोय एसटी महामंडळाकडून करण्यात येणार आहे.(मुंबईकरांसाठी खुशखबर! आधी बसचे तिकिट दर कमी आणि आता 400 एसी बस ची भर)

तसेच सप्टेंबर महिन्यात दिवाकर रावते यांनी असे सुद्धा सांगितले होते की, बस बंद पडल्यास प्रवाशांना फार त्रास सहन करावा लागणार नाही आहे. कारण बस बंद पडल्यास प्रवाशाला अन्य कोणत्याही बस मधून कोणतेही अतिरिक्त शुल्क न भरता प्रवास करता येणार आहे. यामध्ये बसच्या पास धारकांनासुद्धा लाभ होणार असल्याचे सांगण्यात आले होते.

दुसऱ्या बाजूला दिवाळीच्या काळात एसटीकडून 10 टक्के हंगामी भाडेवाढीचा निर्णय घेण्यात आला आहे. याचा फटका प्रवाशांना बसणार आहे. ही तिकिट दरातील भाववाढ 25 ऑक्टोबर ते 4 नोव्हेंबर पर्यंत असणार आहे. हा निर्णय 24 ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासूनच लागू गोणार आहे. एसटीची ही भाडेवाढ साधी (परिवर्तन), निमआरामी (हिरकणी) आणि शिवशाही (आसन) बससाठी लागू होणार आहे.