Kalaram Mandir in Nashik (PC-Wikimedia Commons)

राज्यातील कोरोना विषाणूच्या (Coronavirus) पार्श्वभूमीवर नाशिक येथील श्री काळाराम मंदिर संस्थानच्या (Kalaram Mandir Sansthan) वतीने सलग दुसऱ्या वर्षी वासंतिक नवरात्र उत्सव रद्द करण्यात आला आहे. संसर्ग रोखण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं संस्थांनचे अध्यक्ष विकास कुलकर्णी यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवलं आहे. 13 ते 23 एप्रिलदरम्यान वासंतिक नवरात्र उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. परंतु, कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर शासनाने सर्व राजकीय, सामाजिक आणि धार्मिक कार्यांवर निर्बंध लावले आहेत.

याच पार्श्वभूमीवर नाशिक येथील काळाराम मंदिर संस्थानच्या वतीने आयोजित करण्यात आलेला वासंतिक नवरात्र उत्सव रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (वाचा - Weekend Lockdown in Maharashtra: राज्यातील निर्बंधांदरम्यान नक्की काय सुरु व काय बंद याबाबत शासनाने जारी केले FAQs; जाणून घ्या कोणती दुकाने उघडी असतील)

दरम्यान, राज्यात कोरोना विषाणूचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. शुक्रवारी महाराष्ट्रात 58,993 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली. तसेच 45391कोरोना बाधित रुग्ण बरे झाले. राज्यात एकूण 534603 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. सध्या नाशिक शहर आणि ग्रामीण परिसरात कोरोना रुग्णांची संख्या वाढण्याचं प्रमाण जलद गतीने वाढत आहे. याशिवाय तेथील रुग्णांना ऑक्सिजन तुटवड्याची समस्या भासत आहे. नाशिकमध्ये दररोज साधारण 3500 ते 4000 कोरोना चाचण्या करण्यात येत आहेत. मात्र, तरीदेखील जिल्हातील कोरोना संसर्ग कमी होताना दिसत नाहीये.