हुल्लडबाज तरुणांना विशेष टास्क फोर्सचा दणका (Photo Credit : ANI)

सांगली (Sangli) येथे पावसामुळे कृष्णा नदीची (Krishna River) पातळी वाढली आहे. अशात नागरिकांना सूचना देऊनही काही हुल्लडबाज तरुण हे पाणी पाहण्यासाठी नदीकाठी गर्दी करत आहेत. आता अशा तरुणांना स्पेशल टास्क फोर्सने (Special Task Force) चांगलाच दणका दिला आहे. या तरुणांना शिक्षा म्हणून चक्क उठाबशा (Squats) काढायला लावल्या आहेत. या गोष्टीचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, 12-13 तरुण कान पकडून उठा बशा काढत आहेत. टास्क फोर्सचे लोक त्यांना 500 उठा बशा काढा असे सांगत आहेत. टास्क फोर्सच्या या शिक्षेमुळे लाजेखातर इतर लोक नदी काठी जाणार नाहीत अशा विश्वास व्यक्त केला जात आहे.

सध्या सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. या पावसामुळे कृष्णा नदीची पातळी चांगलीच वाढली आहे. अशात प्रशासनाने नागरिकांना नदीपात्रापासून लांब राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. नदीचे वाढलेले पाणी पाहायला येणाऱ्या नागरिकांनी केलेल्या गर्दीमुळे अनेक दुर्घटना झाल्याच्या घटना घडल्या आहेत. या परिसरातील पूर स्थिती लक्षात घेता प्रशासनाने या ठिकाणी स्पेशल टास्क फोर्स तैनात केले आहेत. आज या ठिकाणी प्रशासनाने सूचना देऊनही काही तरुण पाण्याजवळ गेले होते. त्यांना शिक्षा म्हणून टास्क फोर्सने उठा बशा काढायला लावल्या. (हेही वाचा: कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात पुढील 5 दिवस मुसळधार पावसाची शक्यता; सातारा, पुणे मध्ये रेड अलर्ट)

एएनआय ट्वीट -

दरम्यान, कोयना धरणातून पाण्याचा मोठ्याप्रमाणावर विसर्ग सुरु असल्याने कृष्णा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. सोमवारी कृष्णा नदीची पाणीपातळी 32 फुटांवर जाऊन पोहोचली. सांगली शहरात रात्रीपासून चारशेहून अधिक लोकांचे स्थलांतर करण्यात आले. पूरबाधितांसाठी शहरातील शाळा आणि रिकाम्या इमारतींमध्ये थांबण्याची व्यवस्था केली आहे. नदीकाठच्या 104 गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.