सोनिया गांधी आणि शरद पवार यांची आजची बैठक रद्द; नवाब मलिक यांची माहिती
Sonia Gandhi, Sharad Pawar (Photo Credits: PTI)

महाराष्ट्रात सुरु असणाऱ्या सत्ता संघर्षाच्या पार्श्वभूमीवर आज, 17 नोव्हेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस (NCP)  प्रमुख शरद पवार (Sharad Pawar)  आणि काँग्रेस (Congress) हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांची दिल्ली (Delhi) येथे बैठक घेण्यात येणार होती. मात्र ही नियोजित बैठक आता रद्द करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस नेते नवाब मलिक (Nawab Malik)  यांनी दिली आहे. आज ऐवजी उद्या, म्हणजेच 18 नोव्हेंबर रोजी ही बैठक घेण्यात येईल असे इंडिया टुडे तर्फे सांगण्यात आले आहे. दरम्यान आज, पुणे (Pune) येथे शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक बोलावली आहे.

(नक्की वाचा -या 5 मुद्द्यांवर जाहीर चर्चा करायला राजकीय नेते घाबरतात; गल्ली ते दिल्ली कोणीच बोलत नाही)

प्राप्त माहितीनुसार, महाराष्ट्रातील राजकीय संघर्षात आता महा शिव आघाडी म्हणजेच शिवसेना, काँग्रेस, आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या हातमिळवणीनें लवकरच सत्ता स्थापन होण्याची चिन्हे आहेत पण तत्पूर्वी तिन्ही पक्षांमधील सत्तावाटपाचा फॉर्मुला ठरणे आवश्यक आहे, माध्यमाच्या सूत्रानुसार, सोनिया गांधी, शरद पवार यांच्या भेटीत सत्ता वाटपासाठी किमान समान कार्यक्रम आणि तिन्ही पक्षांमध्ये होणाऱ्या खातेवाटपावर चर्चा होणार असल्याचे अंदाज आहेत.

ANI ट्विट

दरम्यान, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत 105 जागांवर विजय मिळवून सुद्धा बहुमत सिद्ध न करता आल्याने राज्यातील मोठा पक्ष भाजपा मात्र सध्या बॅक फूट वर असल्याचे स्पष्ट आहे. तर, महायुतीला तोडून मित्रपक्ष शिवसेनेने महाआघाडीसोबत मिळून सत्ता स्थापण्याचा निर्णय घेतला आहे.महाराष्ट्र सत्ता संघर्षात सध्या हे चार पक्ष प्रबळ असले तरीही अद्याप कोणीही यशवीरित्या बहुमत सिद्ध करून सरकार स्थापन करू शकलेले नाही परिणामी राज्यात सध्या राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे.