Thane: पैशांवरुन माय-लेकांमध्ये वाद; पोटच्या मुलाकडून आईची हत्या, ठाण्यातील घटना
Image used for represenational purpose (File Photo)

पैशांच्या वादातून एका तरूणाने स्वत:च्या आईची हत्या (Son Kills Mother) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना ठाण्यातील (Thane) मुंब्रा (Mumbra) परिसरात घडली आहे. मायलेकांमध्ये सोमवारी दुपारी पैशांवरुन वाद झाला होता. या वादातून आरोपी मुलाने जवळ असलेल्या स्क्रू ड्रायव्हरने आईच्या छातीत गंभीर वार केले. ज्यामुळे तिचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी मुंब्रा पोलिसांनी (Mumbra Police) आरोपी मुलाला बेड्या ठोकल्या आहेत. तसेच त्याच्याविरोधात आयपीसीच्या कलम 302 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

विशाल एलझेंडे असे अटक करण्यात आलेल्या तरूणाचे नाव आहे. विशाल हा आपली आई उर्मिला एलझेंडे यांच्यासोबत मुंब्रा शहरातील रेतीबंदर परिसरात राहायला होता. विशालला त्याच्या कमाईतून मिळालेल्या पैशांची उधळपट्टी करायची सवय होती. तसेच आपल्या जवळील पैसे संपल्यनंतर तो उर्मिला यांच्यामागे पैशांसाठी तगादा लावायचा. यामुळे विशाल आणि उर्मिला यांच्यात सतत वाद होत असे. दरम्यान, सोमवारी दुपारी विशालने पुन्हा उर्मिला यांच्याकडे पैसे मागितले. परंतु, उर्मिला यांनी नकार दिल्याने विशालने जवळ असलेल्या स्क्रू ड्रायव्हरने त्यांच्या छातीत वार केले. ज्यामुळे त्यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ माजली आहे. हे देखील वाचा-Pune: मुख्यध्यापकाचे विद्यार्थीनीसोबत संतापजनक कृत्य, पुण्यातील राजगुरूनगर येथील घटना

या घटनेची माहिती मिळताच मुंब्रा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर त्वरीत आरोपीला अटक करत त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच उर्मिळा यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जवळच्या शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी पुढील चौकशीला सुरुवात केली आहे.