श्रीपाद जोशी (संग्रहित - संपादित प्रतिमा

यावर्षीचे साहित्य संमेलन सुरु होण्यापूर्वीच गाजत असल्याचे दिसत आहे. साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या लेखिका नयनतारा सहगल यांचे निमंत्रण रद्द करून मराठी साहित्य मंडळाने फार मोठी नामुष्की ओढवून घेतली आहे. साहित्यविश्वात लेखणीला घाबरून एका लेखकाला जाणूनबुजून वगळावे ही मोठी शरमेची गोष्ट असल्याची टीका साहित्य मंडळावर होत आहे. अशातच आता साहित्य मंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी (Shripad Joshi) यांनी तडकाफडकी पदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर आता महामंडळाच्या उपाध्यक्ष असलेल्या विद्या देवधर यांच्याकडे अध्यक्षपदाची सूत्रे येण्याची शक्यता आहे. (हेही वाचा : मराठी साहित्य संमेलन आयोजकांकडून नयनतारा सहगल यांचं आमंत्रण रद्द)

यवतमाळ येथे शुक्रवारपासून (11 जानेवारी) तीन दिवस 92 वे अखिल भारतीय मराठी साहित्यसंमेलन होणार आहे. संमेलनाच्या उद्घाटनासाठी ज्येष्ठ लेखिका नयनतारा सहगल यांना पाचारण करण्यात आले होते. मात्र काही स्थानिक संस्थांनी त्या इंग्रजी लेखिका आसल्याचे सांगून, त्यांना बोलावल्यास संमेलन उधळून लावू अशी भूमिका घेतली. डॉ. वि. भि. कोलते संशोधन केंद्र व वाचनालय या संस्थेकडे संमेलनाचे यजमानपद आहे, त्यामुळे कार्याध्यक्ष डॉ. रमाकांत कोलते यांनी सेहगल यांचे निमंत्रण रद्द करून टाकले. याबाबत आयोजक संस्था आणि मराठी साहित्य महामंडळ यांच्यात तीव्र मतभेदही निर्माण झाले. या पार्श्वभूमीवर श्रीपाद जोशी यांनी आपला विदर्भ साहित्य संघाच्या ई-मेलवर आपल राजीनामा पाठवून दिला आहे. निमंत्रण रद्द करण्यापूर्वी श्रीपाद जोशी यांनी इतर साहित्यिकांशी याबाबत चर्चा करायला हवी होती असे काही लेखकांचे म्हणणे आहे.

दरम्यान नयनतारा अन्चे निमंत्रण रद्द केल्यानंतर. संमेलनाच्या उद्घाटनासाठी तीन प्रमुख नावे चर्चेत आहेत. यामध्ये ज्येष्ठ नाटककार महेश एलकुंचवार, प्रसिद्ध साहित्यिक सुरेश द्वादशीवार आणि कवी विठ्ठल वाघ यांच्या नावांचा विचार महामंडळाकडून करण्यात येत आहे.