यवतमाळमध्ये होणार्या 92 व्या मराठी साहित्य संमेलनामध्ये अमराठी साहित्यिकाकडून उद्धाटन करण्यावरून वाद रंगला आहे. यंदा प्रसिद्ध इंग्रजी साहित्यिकार नयनतारा सहगल (Nayantara Sahgal) यांच्याहस्ते उद्घाटन होणार होते मात्र मराठी साहित्यिक असताना अमराठी साहित्यिकांकडून उद्धाटन कशाला? असा प्रश्न विचारत मनसेच्या राजू उंबरकर यांनी संमेलन उधळण्याचा इशारा दिला होता. ही धमकी मिळताच साहित्य संमेलनाकडून नयनतारा सेहगल यांची आमंत्रणपत्रिका रद्द करण्यात आली आहे.
यंदा साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद मराठी लेखिका अरूणा ढेरे यांच्याकडे आहे. नयनतारा या प्रसिद्ध इंग्रजी लेखिकाआहेत. नयनतारा यांना पत्राद्वारा त्यांचे आमंत्रण रद्द केल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले आहे. नयनतारा यांचे अशाप्रकारे आमंत्रण रद्द करण्यावरून साहित्यविश्वात नाराजीचे सूर आहेत. अनेकांनी या घटनेचा निषेध नोंदवला आहे.
नयनतारा यांनी भारतामध्ये 'पुरस्कार वापसी' या मोहिमेची सुरूवात केली.
देशामधील असहिष्णू वातावरणावर टीका करत साहित्य अकादमीचा पुरस्कार परत केला होता. त्यांच्यासोबतच 10 दिग्गज साहित्यिकांनीही आपले पुरस्कार परत केले होते. नयनतारा सेहगल या भारताचे पंतप्रधान पंडीत नेहरू यांच्या भाची आहेत. 1986 मध्ये साहित्य अकादमी पुरस्काराने 'रिच लाईक अस' (Rich Like Us)या पुस्तकासाठी त्यांचा गौरव करण्यात आला आहे.