'शिवसेना-भाजप युतीतील मुख्यमंत्रीपदाचा तिढा सुटेपर्यंत मला मुख्यमंत्री करा'; बीड जिल्ह्यातील शेतकऱ्याचे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्यपालांना पत्र
farmer | Image only representative purpose (Photo credit: File Image)

शिवसेना-भाजप (BJP-Shiv Sena Alliance युतीतील मुख्यमंत्री पदाचा तिढा सुटेपर्यंत आपल्याला मुख्यमंत्री पदाचा पदभार मिळावा अशी मागणी बीड (Beed District) येथील एका शेतकऱ्याने केली आहे. श्रीकांत विष्णु गदळे (Shrikant V Gadale) असे या शेतकऱ्याचे नाव आहे. हा शेतकरी मूळचा केज तालुक्यातील दहिफळ वडमाऊली या गावचा रहिवासी आहे. या शेतकऱ्याने आपल्या मागणीचे पत्र जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. महत्त्वाचे म्हणजे आपल्या दखल न घेतल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही श्रीकांत विष्णु गदळे आपल्या पत्रात दिला आहे.

या पत्रात या शेतकऱ्याने म्हटले आहे की, आपण गेली 10 ते 12 वर्षे राजकारण आणि समाजकारणात अग्रेसर आहे. तसेच, आपण शेतकरी, गोरगरीब जनतेच्या प्रश्नावर सातत्याने काम करीत आहोत. सध्या महाराष्ट्रामध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेतीमध्ये पेरलेल्या सर्व पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे या ठिकाणचा शेतकरी, सर्वसामान्य वर्ग चिंतेत असताना भाजप आणि शिवसेना यांच्यात मुख्यमंत्री पदाचा तिढा निर्माण झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील सर्वसामान्य वर्ग अडचणीत सापडला आहे. राज्यातील जनतेच्या हितासाठी हा निर्णय घेण्यात यावा, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांना लिहिलेल्या पत्रात श्रीकांत विष्णु गदळे यांनी केली आहे. (हेही वाचा, भाजप-शिवसेना तुटेपर्यंत ताणणार की 'ठरलंय तसंच करणार'? काय म्हणाले उद्धव ठाकरे? )

एएनआय ट्विट

श्रीकांत विष्णु गदळे यांनी जिल्हाधिकारी यांना लिहिलेल्या पत्रात पुढे म्हटले आहे की, मा. राज्यपाल साहेबांना विनंती करतो की, भाजप-शिवसेना मुख्यमंत्री पदाचा तिढा सुटेपर्यंत मला मुख्यमंत्री पदाचा पदभार देण्यात यावा. जेणेकरुन मी शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेचे प्रश्न तक्काळ सोडवील आणि त्यांना न्याय देईल असा मी विश्वास देतो. माझ्या निवेदनाची दखल न घेतल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही श्रीकांत विष्णु गदळे आपल्या पत्रात दिला आहे.