पहिल्या वाढदिवसाचा केक कापणाच्या काही वेळापूर्वीच एका चिमुकलीचा गॅलरीतून पडून दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना पुणे (Pune) येथील सिंहगड रोड (Sinhagad Road) परिसरात बुधवारी घडली आहे. याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी अपघाती मृत्युची नोंद केली असून पुढील चौकशीला सुरुवात केली आहे. घरात वाढदिवसाची तयारी सुरु असताना मृत मुलगी गॅलरीमध्ये खेळत होती. याचवेळी गॅलरीतून खाली पडली. त्यानंतर तिला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपाचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी तिच्या कुटुंबियांनी सांगितले. या घटनेने आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांमध्ये चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे.
अद्विका गाथाडे असे मृत्यू झालेल्या एका वर्षीय मुलीचे नाव आहे. अद्विका ही आपल्या आई-बाबांसोबत नरे येथील राजवी हाईट्स सोसायटीमध्ये राहायला आहे. अद्विका हीचा बुधवारी पहिला वाढदिवस होता. या निमित्ताने सांयकाळी 7 वाजताच्या सुमारास अद्विकाची आई सोसायटीतील लोकांना तिच्या वाढदिवसाचे निमंत्रण देण्यासाठी गेली होती आणि तिचे बाबा बाथरुमला गेले होते. त्यावेळी अद्विका ही गॅलरीत खेळत होती. मात्र, याचवेळी अद्विका गॅलरीतून खाली पडली. ही घटना पाहताच शेजाऱ्यांनी अद्विकाच्या आई-बाबांना कळवले. त्यानंतर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अद्विकाला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे तेथील डॉक्टरांनी सांगितले, अशी माहिती लोकसत्ताने आपल्या वृत्तात दिली आहे. हे देखील वाचा- Satara: काळज गावातील बाळाच्या हत्येचं गुढ उलगडलं; एकतर्फी प्रेमातून तरुणाचं धक्कादायक कृत्य
या घटनेने गाथाडे कुटुंबियांवर दुख:चे डोंगर कोसळले आहे. तसेच संपूर्ण परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी स्थानिक पोलीसांनी अपघाती मृत्युची नोंद केली असून आजूबाजुला राहणाऱ्या शेजाऱ्यांची देखील विचारपूस करत आहेत. याशिवाय सीसीटीव्ही फुटेजचा तपास करत आहे.