Suicide | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

Thane: ठाण्यात अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे. कर्जाची परतफेड करू न शकल्याने ठाण्यातील व्यक्तीने कीटकनाशन प्राशन करून आत्महत्या (Suicide) करण्याचा प्रयत्न केला. कर्ज वसूली अधिकारी फ्लॅट जप्त करण्यासाठी आले असता व्यक्तीने हे धक्कादायक पाऊल उचलल्याचं बोललं जात आहे. यासंदर्भात पीटीआयने वृत्त दिलं आहे.

कल्याण विभागाअंतर्गत महात्मा फुले चौक पोलिसांनी श्याम सांगवे या व्यक्तीविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 309 (आत्महत्येचा प्रयत्न) आणि 186 (लोकसेवकाच्या कामात अडथळा आणणे) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. (हेही वाचा - Jalgaon: आमदार किशोर पाटील यांच्या कार्यकर्त्यांची स्थानिक पत्रकारांना मारहाण; काय आहे नेमकी प्रकरण? जाणून घ्या Watch Video)

प्रथम माहिती अहवालानुसार (एफआयआर) सांगवे यांनी कल्याणमधील रामबाग येथील घरासाठी एका लघु वित्तसंस्थेकडून कर्ज घेतले होते. कर्जाची थकबाकी झाल्याने वसूली अधिकाऱ्यांनी कर्जदाराविरोधात परतफेडीची कायदेशीर प्रक्रिया सुरू केली. मार्च 2023 मध्ये अतिरिक्त जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी स्थानिक तहसीलदारांना त्यांची मालमत्ता जप्त करण्याचे निर्देश दिले.

एफआयआरनुसार, महसूल अधिकारी 13 जून रोजी सांगवे यांच्या घरी मालमत्ता जप्त करण्यासाठी गेले होते. परंतु, त्यांनी कर्जाची परतफेड करण्यासाठी वेळ मागितल्याने कारवाई 28 जूनपर्यंत स्थगित करण्यात आली होती. 9 ऑगस्ट रोजी महसूल अधिकारी आणि पोलीस आणि स्मॉल फायनान्स कंपनीचे कर्मचारी पुन्हा त्यांच्या घरी गेले तेव्हा सांगवे यांनी कारवाईला विरोध केला आणि त्यांना धमकावले.

सांगवे यांचा प्लॅट जप्त करण्यासाठी वसूली अधिकारी आले तेव्हा त्यांनी घराला आतून कुलूप लावले. त्यानंतर पथकाने घरात प्रवेश केला असता त्यांनी कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. सांगवे यांना सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले, असे एफआयआरमध्ये म्हटले आहे.