Suicide | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

आपल्या पतीने आत्महत्या केल्याचे पाहून संबंधित महिलेनेही त्याच हुकाला गळफास लावून आपले जीवन संपवल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना पुणे (Pune) शहरातील रस्ता पेठ परिसरात येथे आज सकाळी घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच समर्थ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून दोघांचाही मृतदेह शेवविच्छेदनासाठी पुण्यातील ससून रुग्णालयात पाठवण्यात आली आहेत. पतीच्या आत्महत्येमागचे कारण अद्याप अस्पष्ट असून स्थानिक पोलीस पुढील तपास करत आहेत. मिळालेल्या महितीनुसार, मयत दाम्पत्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद सुरु होते. यातूनच ही घटना घडली असावी, असा अंदाजही वर्तवण्यात येत आहे.

सुरज पालसिंग सोनी आणि अरुणा सुरज सोनी असे आत्महत्या केलेल्या दाम्पत्याचे नाव आहेत. सुरजचा गेल्या वर्षीच अरुणाशी प्रेमविवाह झाला होता. गेल्या चार महिन्यांपासून सुरज हा पदमजी पार्क, विश्राम सोसायटीत सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होता. सोसायटीच्या आवारातच ते एका खोलीत राहत होते. अरूणाचा भाऊ गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांच्यात राहायला आला होता. तसेच गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यात कौटुंबिक वाद सुरु होत असल्याचे कळत आहे. शनिवारी रात्री सुरज खोलीत झोपला होता. तर, अरूणा आणि तिचा भाऊ बाहेर झोपले होते. परंतु, रविवारी सकाळी अधिक वेळ झाला तरी, सुरजने दार उघडले नाही म्हणून त्याच्या मेव्हण्याने खिडकीतून डोकावून पाहीले. त्यावेळी सुरज याने पत्र्याच्या हुकाला गळफास घेतल्याचे आढळून आले. त्यानंतर त्याने ही माहिती सुरजच्या भावाला सांगण्यासाठी घराबाहेर पडला. परंतु, सुरजच्या भावाला घेऊन परतल्यानंतर अरूणानेही त्याच हुकाला गळफास लावून आत्महत्या केल्याचे आढळून आले. ज्यामुळे संपूर्ण परिसरात एकाच खळबळ उडाली आहे. हे देखील वाचा- पुणे: आई वडिलांनी दोन चिमुकल्यांसह घरातच गळफास लावून केली आत्महत्या; पोलीस तपास सुरु

पुणे शहरात आत्महत्येच्या घटना थांबायचे नावच घेत नाही. शुक्रवारी पुण्यातील सुखसागर भागातील एकाच कुटुंबातील चौघांनी आत्महत्या केल्याची घटनेला काही तास होत नाही, तोच शहरातील सिंहगडवरील एका मंडप व्यावसायिकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली होती.