पुणे: आई वडिलांनी दोन चिमुकल्यांसह घरातच गळफास लावून केली आत्महत्या; पोलीस तपास सुरु
Representational Image | (Photo Credits: ANI)

पुणे (Pune) शहरातील सुखसागर नगर परिसरात राहणाऱ्या एका कुटुंबातील चार जणांनी राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याचे धक्कादायक वृत्त समोर येत आहे. गुरुवार, 18  जून रोजी रात्रीच्या वेळेस ही घटना घडली. मृतांमध्ये अतुल शिंदे (33 वर्ष), जया शिंदे (32 वर्ष), ऋग्वेद शिंदे (6 वर्ष) आणि अंतरा शिंदे (3 वर्ष) या चौघांचा समावेश आहे. दोन्ही लहान मुलांना पालकांनीच फाशी लावल्याची शक्यता आहे. दोन दिवसांपासून शिंदे कुटुंबातील कोणीही घराबाहेर दिसले नव्हते, तसेच त्यांचा आवाजही येत नव्हता, फोनला सुद्धा ते उत्तर देत नव्हते, अखेरीस शेजाऱ्यांनी याबबाबत पोलिसांना फोन करून माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन घराचे दार तोडून आत प्रवेश केला ज्यावेळी समोरच या चौघांचे मृतदेह लटकलेले पाहायला मिळाले.

पोलिसांच्या माहितीनुसार, कुटुंबप्रमुख अतुल शिंदे हे शाळेतील मुलांचे आयडी बनवण्याच्या व्यवसायात होते. मात्र मागील काही महिन्यापासून त्यांचा व्यवसाय बंद होता, लॉकडाऊनची परिस्थिती पाहता आता शाळा सुरु होण्याच्या सीझन मध्ये सुद्धा त्यांना काम मिळेल अशी शक्यता कमीच होती. यामुळे शिंदे कुटुंबावर आर्थिक संकट आले होते. मात्र हेच त्यांच्या आत्महत्येचे कारण आहे असे अद्याप स्पष्टपणे समोर आलेले नाही. Suicide Prevention: WHO च्या मते महिलांपेक्षा पुरुषांमध्ये आत्महत्या करण्याचे प्रमाण जास्त, यामागील कारण आणि उपाय जाणून घ्या

दरम्यान या कुटुंबाने आत्महत्या करताना कोणतीही सुसाईड नोट ठेवलेली नाही. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून अधिक तपास केला जात आहे. या चौघांचे मृतदेह पोस्टमोर्टम साठी पाठवण्यात आले असून त्यानंतर त्यांच्या नातेवाईकांच्या हाती सोपवले जातील.