Bhandara Road Accident: धक्कादायक! डॉक्टरांकडे तपासणीसाठी जाताना ट्रकच्या धडकेत एका गर्भवती महिलेचा मृत्यू; भंडारा जिल्ह्यातील घटना
प्रातिनिधिक प्रतिमा (File Image)

डॉक्टरांकडे नियमित तपासणीसाठी जात असताना ट्रकच्या धडकेत एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. ही धक्कादायक घटना भंडारा (Bhandara) जिल्ह्यातील भंडारा-करडी मार्गावर घडली आहे. या घटनेने संपूर्ण भंडारा जिल्ह्यात एकच खळबळ माजली आहे. मृत महिला आपल्या पतीसह दुचाकीवरून जात असताना हा अपघात घडला आहे. यात संबंधित महिलेच्या पतीदेखील गंभीर जखमी झाल्याचे कळत आहे. महिलेच्या मृत्यूमुळे अपघाताच्या ठिकाणी काही काळासाठी तणाव निर्माण झाला होता. तसेच अचानकपणे अपघात झाल्यामुळे रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती.

मनीषा किरणापुरे असे मृत महिलेचे नाव आहे. मनीषा या गर्भवती असून त्यांचे पती करसदास यांच्यासह त्या भंडारा येथील डॉक्टरांकडे नियमित तपासणीसाठी जात होती. त्यावेळी भंडारा-करडी मार्गावर विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. यात मनीषा यांच्या अंगावर ट्रक गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर, करसदास किरणापुरे गंभीर जखमी झाले आहेत, अशी माहिती टीव्ही9 ने आपल्या वृत्तात दिली आहे. या घटनेने आजूबाजुच्या परिसरात चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे. हे देखील वाचा- Pimpri-Chinchwad Murder: पिंपरी- चिंचवड येथे दारु पिण्यासाठी पैसे न दिल्याने मुलाकडून वडिलांची हत्या

मिळालेल्या माहितीनुसार,अपघातातील ट्रकचा मालक जिल्ह्यातील राजकीय नेता असून तो स्वत: जिल्हा परिषदेचा सदस्य असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, भंडारा-करडी मार्गावर वैनगंगा नदी असल्याने या मार्गाने दररोज हजारो संख्येने अवैध वाळूचे ट्रक धावतात. त्यामुळेच अपघात झाल्याचे बोलले जात आहे.