![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2019/10/Crime-784x441-380x214.jpg)
पुण्यातील (Pune) एका व्यक्तीने आपल्याच वडिलांची हत्या (Murder) केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) येथे रविवारी घडली. या घटनेने पुन्हा एकदा पिंपरी-चिंचवड हादरुन गेले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सध्या आरोपी मुलगा फरार झाला असून स्थानिक पोलीस त्याच्या शोध घेत आहेत. दारु पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या रागातून आरोपीने आपल्या वडिलांच्या डोक्यात तांब्याचा हंडा घातला होता. यात त्यांना गंभीर दुखापत झाली होती. ज्यामुळे उपचारासाठी त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
तानाजी सदबा सोलंकर (वय, 52) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. तानाजी हे चिंचवड येथील वेताळनगरच्या मोरया हौसिंग सोसायटीमधील रहिवाशी आहे. तर, संजय तानाजी सोलंकर असे आरोपीचे नाव आहे. रविवारी सायंकाळी संजय दारु पिऊन घरी आल्यानंतर तानाजी आणि त्याची आजी चंद्रभागा सदबा सोलंकर यांना दारू पिण्यासाठी पैसे मागू लागला. दरम्यान, त्यांनी पैसे न दिल्याने त्याने वडिलांसह त्याच्या आजीलाही शिवीगाळ केली. तसेच त्यांना हाताने मारहाण केली. त्यावेळी संजयने रागाच्या भरात तानाजी यांच्या डोक्यात तांब्याचा हंडा घातला. ज्यात त्यांना गंभीर दुखापत झाली असून उपचार दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पोलीस आरोपी मुलांचा शोध घेत आहेत. हे देखील वाचा- Pune Rape: पुणे जिल्ह्यातील हडपसर येथे एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार; बाळ जन्मल्यानंतर आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल
पिंपरी- चिंचवड येथे एकामागे एक धक्कादायक घटना घडत असल्याने संपूर्ण शहर हादरून गेले आहे. तसेच त्यामुळे आता तर शहर बिहारच्या दिशेने पावले टाकू लागल्याची भीती व्यक्त केली जातीये. पिंपरी- चिंचवड येथे गेल्या आठदिवसात चार धक्कादायक घटना घडल्या आहेत. यात वरील घटनेने आणखी भर घातली आहे.