कणकवली येथील उद्धव ठाकरे यांच्या सभेसाठी भाडोत्री गर्दी; नितेश राणे यांनी केला व्हिडीओ शेअर
नितेश राणे (Photo credit : youtube)

देशातील सर्वात मोठ्या निवडणुकांना, लोकसभा निवडणुकांना सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रात 2 टप्प्यांमधील मतदान पूर्ण झाले आहे, अजून 2 टप्प्यांमधील मतदान बाकी आहे. या पार्श्वभूमीवर नेत्यांच्या प्रचारसभांचा जोर काही ओसरला नाही. गुरुवारी शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची कणकवलीमध्ये प्रचारसभा झाली. मात्र आता या सभेबाबत एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. शिवसेनेच्या या सभेला चक्क मुंबईवरून भाडोत्री अमराठी माणसे आणल्याचा आरोप काँग्रेसचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी केला आहे. हा आरोप सिद्ध करण्यासाठी त्यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये शिवसेनेच्या प्रचारसभेला आलेला अमराठी तरुण, अजून 50 गाड्या घेऊन माणसे आल्याचे सांगत आहे.

उद्धव ठाकरे यांनी एकाच मतदारसंघात दोन सभा घेतल्या होत्या. पहिल्या सभेनंतर दुसऱ्या सभेलाही उस्फुर्त प्रतिसाद दिल्याने त्यांनी जनतेचे आभारही मानले होते. मात्र नितेश राणे यांनी हा व्हिडीओ शेअर करून हा प्रतिसाद कसा मिळाला हे दाखवून दिले आहे. राणे यांनी जे ट्वीट केले आहे त्यामध्ये त्यांनी या सभेला मुंबई, कोल्हापूर, रत्नागिरी येथून गर्दी जमवण्यात आली असल्याचे सांगितले आहे.

(हेही वाचा: सीएसएमटी परिसरात पूल दुर्घटनेवरून नितेश राणे यांचा 'शिवसेना' पक्षावर हल्लाबोल)

दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी कणकवली येथील सभा चांगलीच गाजली होती. ‘कोकणातल्या गुन्हेगारांनी परत तोंड वर काढलं तर ठेचून काढू' अशा शब्दात शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी राणे यांच्यावर टीका केली होती. विरोधकांनी जर पुन्हा आम्हाला डिवचण्याचा प्रयत्न केला तर आम्ही ठेचून काढू. आमच्याकडे आता असे पुरावे आहेत की आम्ही तुम्हाला पुरून टाकू, असा इशाराही त्यांनी दिला होता. मात्र आता या गोष्टी नेमक्या कोणत्या जनतेसमोर बोलल्या गेल्या त्याबद्दल सांशकता निर्माण होत आहे.