महाराष्ट्रातील गोरगरीब जनतेला 10 रुपयांमध्ये सकस आणि परवडणारे 'शिवभोजन' (ShivBhojan Thali) देण्याची महत्वाची घोषणा महाराष्ट्र विकास आघाडीने केली. सुरवातीला प्रायोगिक तत्वावर 50 ठिकाणी 'शिवभोजन' केंद्रे सुरू करणार आणि त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात याची सुरुवात होणार असे याचे स्वरूप होते. मात्र आता महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात ‘शिवभोजन’ उपलब्ध होणार असल्याची माहिती मिळत आहे. याबाबत शासनाने आपला निर्णय जारी केला आहे. नागपूरसह संपूर्ण राज्यात 18 हजार ठिकाणी 'शिव भोजन’ योजना सुरु करण्याचा शासनाचा मानस आहे.
सुरुवातीला प्रायोगिक तत्वावर जिल्ह्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी हे ‘शिवभोजन’ उपलब्ध करून दिले जाणार आहे. यानुसार मुंबई शहर आणि उपनगर, ठाणे, कोकण, विदर्भ, मराठावाडा, पश्चिम महाराष्ट्राच्या प्रत्येक जिह्यातील मुख्यालयात हे शिवभोजन मिळणार आहे. या थाळीचा दर शहरात 50 रुपये आणि ग्रामीण भागामध्ये 35 रुपये असेल. मात्र जनतेला फक्त 10 रुपये द्यावे लागतील, उर्वरित रक्कम सरकारकडून अनुदान स्वरूपात देण्यात येईल. (हेही वाचा: मुंबई: सीएसएमटी स्टेशन परिसरात 2021 च्या मध्यापर्यंत बांधला जाणार नवा पूल; लवकरच निघणार टेंडर्स)
महिला बचत गट, रेस्टॉरंट्स, स्वयंसेवी संस्था (NGO) 'शिवभोजन’ थाळी सुरू करण्यास पात्र आहेत. यासाठी स्वतःची जागा असणे आवश्यक आहे. शहरातील जिल्हादंडाधिकारी व तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखालील गठित समिती याचा निर्णय घेईल. थाळीमध्ये 2 चपाती, भाजी, भात आणि वरण असेल. मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती संपूर्ण योजनेचे निरीक्षण करेल. दुपारी 12 ते 2 या वेळेत ही थाळी उपलब्ध असेल. सध्या मुंबईत 1950, ठाण्यात 1350, पालघर 450, नागपूर 750 तर पुण्यात 1500 थाळय़ा उपलब्ध करून दिल्या जातील.