सीएसएमटी स्टेशन परिसरातील पादचारी पूल दुर्घटनेला 9 महिने पूर्ण झाल्यानंतर आता या ठिकाणी पुन्हा नवा ब्रीज उभारण्याच्या कामाला मुंबई महानगर पालिकेने मंजुरी दिली आहे. मुंबई मिरर च्या वृत्तानुसार, 2021 च्या मध्यापर्यंत हा नवा पूल उभारला जाण्याची शक्यता आहे. मागील वर्षी 14 मार्चला संध्याकाळी 7.30 च्या सुमारास अचानक पूलाचा काही भाग कोसळल्याने सुमारे 30 जणांना आपला जीव गमवावा लागला होता. सीएसएमटी पूल दुर्घटना प्रकरण: अटक झालेल्या ऑडिटर नीरज देसाई यांच्यासह 3 बीएमसी अभियंत्यांना 9 महिन्यांनंतर जामीन.
मुंबई महानगरपालिका आयुक्त प्रविण परदेशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, नव्या पूलाच्या बांधणीसाठी लवकरच टेंडर्स काढले जाणार आहेत. सध्या नव्या पूल बांधणीसाठी डिझाईन बनवले जात असून त्यावर शिक्कामोर्तब झाले की टेंडर्स सुरू केले जातील. सध्या पादचारी पूल बंद असल्याने सीएसएमटी परिसरामध्ये ट्राफिकचा प्रश्न उभा राहिला आहे. या भागामध्ये अनेक ऑफिस, महत्त्वाची सरकारी कार्यालय असल्याने स्टेशन जवळचा हा परिसर कायम वर्दळीचा असतो.
18 डिसेंबर दिवशी या दुर्घटनेस जबाबदार ठरवण्यात आलेल्या ऑडिटर आणि 3 अभियंत्याना मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे ऑडिटर नीरज देसाई, कार्यकारी अभियंता अनिल पाटिल, सहाय्यक अभियंता संदीप काकुल्ले आणि मुख्य अभियंता (पुल विभाग) शीतल प्रसाद कोरी हे चौघे 9 महिन्यांनंतर तुरुगांबाहेर आले आहेत. 300 किलो इतके लोकांचे वजन पेलण्याची पुलाची क्षमता होती. मात्र, त्यावर खांब उभारल्याने 14,000 किलोग्रॅम इतक्या वजानाच अतिरीक्त भार पुलावर पडला. त्याचा परीणाम पुल कोसळण्यात झाला, असा दावा देसाई यांच्या वकीलांनी न्यायालयात केला.