Heavy Rain in Kolhapur: महाराष्ट्रात विविध जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळतो आहे. सहाजिकच कोल्हापूर जिल्ह्यातही दमदार पावसाने (Shivaji University Postponed Exam) हजेरी लावली आहे. परिणामी स्थानिक जनजीवन प्रभावत झाले आहे. एकूण परिस्थितीचा सारासार विचार करुन शिवाजी विद्यापीठ प्रशासनाने आज होणाऱ्या सर्व निर्णय घेतला आहे. विद्यापीठाचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव यांनी माहिती देताना सांगितले की, जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी मोठा पाऊस झाला आहे. नद्या नाल्यांना पूर आला आहे. त्यामुळे शिवाजी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील सर्व महाविद्यालयांच्या आज (20 जुलै) होणाऱ्या परिक्षा स्थगित करण्यात आल्या आहेत. विद्यार्थी आणि संबंधित यंत्रणेला पुढील तारीख लवकरच कळवली जाणार आहे.
परीक्षेचे सुधारीत वेळापत्रक लवकरच
शिवाजी विद्यापीठाच्या आज होणाऱ्या परीक्षा स्थगित झाल्या असल्या तरी त्या रद्द झाल्या नाहीत, याची नोंद विद्यार्थ्यांनी घ्यायची आहे. विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावर लवकरच परीक्षेचे सुधारीत वेळापत्रक जारी केले जाणार आहे. त्याबाबतचे परिपत्र लवकरच काढले जाईल. विद्यापीठांतर्गत येणाऱ्या सर्व महाविद्यालयांनी ही माहिती आपल्या विद्यार्थ्यांना अवगत करावी,असेही डॉ. अजितसिंह जाधव म्हणाले. विद्यापीठाच्या विद्यमान शैक्षणिक वर्षांतील उन्हाळी सत्रातील सर्वच्या सर्व म्हणजेच 580 परीक्षा पूर्ण झाल्या आहेत. त्यानंतरचा पाच अभ्यासक्रमांच्या परीक्षांना आता सुरुवात झाली आहे. तर आतापर्यंत 7 अभ्याक्रमकांचे निकाल जाहीर करण्यात आले असल्याचे विद्यापीठाने म्हटले आहे. (हेही वाचा, Shivaji University, Kolhapur: युजीसीच्या कॅटेगरीमध्ये शिवाजी विद्यापीठ 'नंबर वन'; कोल्हापुरच्या शिरपेचात मानाचा तुरा)
कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस
दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यातही पावसाने ओढ दिली होती. मात्र, मागच्या काही दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. खासकरुन मंगळवारी रात्रीपासून मोठ्या प्रमाणावर पर्जन्यवृष्टी होत आहे. पाणलोट क्षेत्रात तर अतिवृष्टी झाल्याचे वृत्त आहे. अतिवृष्टीमुळे डोंगराला पाझर फुटला आहे तर नदी, नाले, तुडुंब भरुन वाहात आहे. अनेक ठिकाणी नदी नाले ओसंडू लागले आहेत. त्यामुळे काही ठिकाणी पूरसदृश्य स्थितीही पाहायला मिळत आहे. त्यामुळे कोल्हापूरची पंचगंगा नदी आणि इतरही नद्यांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होऊ लागली आहे.