शिवसेनेच्या यंदाच्या दसरा मेळाव्याला रामदास कदम यांना असेल का प्रवेश? कथित ऑडिओ क्लिप नंतर दुरावा वाढल्याची चर्चा
रामदास कदम (Photo credit : Youtube)

शिवसेनेचा दसरा मेळावा(Shiv Sena's Dussehra Rally )यंदा सायनच्या षण्मुखानंद सभागृहामध्ये होणार आहे. 50% उपस्थितीमध्ये होणार्‍या या सोहळ्यात शिवसेनेच्या रामदास कदम (Ramdas Kadam) यांना आमंत्रण असेल का? अशी चर्चा आता रंगायला लागली आहे. दरम्यान त्यामागे कारणही तसंच आहे. महाविकास आघाडी मधील मंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्या विरूद्ध काही पुरावे भाजपच्या किरिट सोमय्या यांना रामदास कदमांनी पुरवल्याचा दावा मनसेच्या वैभव खेडेकर यांनी केला आहे. त्यानंतर याबाबतची एक कथित ऑडिओ क्लिप देखील वायरल झाली आहे. परिणामी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आणि रामदास कदम यांच्यात दुरावा आलाय का? याची चर्चा जोर धरू लागली आहे. नक्की वाचा: Ramdas Kadam: लोकांसाठी खरी लोकशाही असत्य आणि हिंसेने साध्य होऊ शकत नाही, रामदास कदम यांचे ट्वीट .

दरम्यान रामदास कदम यांना शिवसेनेच्या यंदाच्या दसर्‍या मेळाव्यात आमंत्रण असेल का? यावर शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी बोलताना ' नेते, उपनेते, आमदार, खासदार हे स्वत:हून येतात. कुणालाही वेगळं आमंत्रण नसतं.' अशी प्रतिक्रिया दिल्याचं टीव्ही 9 चं वृत्त आहे. पण यावेळीही त्यांनी थेट उत्तर टाळल्याने आता उलट सुलट चर्चा रंगायला सुरूवात झाली आहे.

शिवसेनेच्या दसर्‍या मेळाव्याला यंदा 1300 शिवसैनिक उपस्थित असणार आहेत. राज्यातील इतर शिवसैनिकांना उद्धव ठाकरे यांचं भाषण फेसबूक लाईव्ह द्वारा पाहता येणार आहे.

मीडीया रिपोर्ट्सनुसार कथित ऑडिओ क्लिप मुळे रामदास कदम आणि उद्धव ठाकरे यांच्यात दुरावा आहे. दसरा मेळाव्यात रामदास कदम यांना एन्ट्री नसेल अशी शक्यता आहे. कथित ऑडिओ क्लिपची शहानिशा करुन रामदास कदम यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचं समजतं. मात्र, त्यावर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही.

कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर मागील वर्षी देखील शिवतिर्थाऐवजी त्याच्या जवळच असलेल्या वीर सावरकर सभागृहामध्ये मोजक्या लोकांच्या उपस्थितीमध्ये दसरा मेळावा पार पडला होता.