Sanjay Raut on Mahayuti: 'गुलामांच्या तोंडावर तुकडे फेकले जातात', संजय राऊत यांचा एकनाथ शिंदे, अजित पवार गटावर टीका
Sanjay Raut | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

महाविकासआघाडीमध्ये (Maha Vikas Aghadi) असलेल्या घटक पक्षांचे लोकसभा निवडणूक 2024 संदर्भातील जागावाटप जवळपास पूर्ण झाले आहे. ज्या काही चार-दोन जागा राहिल्या आहेत त्यावर आम्ही सर्वजण चर्चा करत आहोत. पुढच्या एक-दोन दिवसांमध्ये त्यावर तोडगा काढला जाईल, अशी माहिती शिवसेना (UBT) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दिली आहे. दरम्यान, महायुतीमध्ये जागावाटपावरुन सुरु असलेल्या संघर्षाच्या पार्श्ववभूमीवर त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची शिवसेना आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर जोरदार टीका केली आहे. 'गुलमांच्या तोंडावर तुकडेच फेकले जातात', अशा शब्दात त्यानी महायुतीतील घटकपक्षांवर टीका केली आहे.

मविआचे निर्णय महाराष्ट्रातच!

महाविकासआघाडीमध्ये असलेल्या प्रत्येक पक्षाला निर्णयाचे स्वातंत्र्य आहे. ते आपापले मुद्दे मांडतात. त्यावर विचार होतो. जागावाटपाच्या चर्चेसाठी आम्ही सर्व निर्णय महाराष्ट्रातच घेत असतो. कधी उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान 'मातोश्री' येथे तर कधी शरद पवार यांचे निवास्थान 'सिल्वर ओक' या ठिकाणी चर्चा होते. गरज पडल्यास आम्ही अन्य ठिकाणीही चर्चेस बसतो. मात्र, आमचे निर्णय आम्ही महाराष्ट्रातच घेतो. जागावाटपाच्या चर्चेसाठी आम्हाला एखाद्या पक्षाच्या पाठिमागे फिरावे लागत नाही तसेच दिल्लीत जाऊन नेत्यांच्या घराबाहेर लॉनवर रुमाल टाकून बसावेही लागत नाही, असा टोला संजय राऊत यांनी महायुतीमध्ये असलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षला लगावला. (हेही वाचा, Sanjay Raut Criticized BJP: आज या देशात कोणीही सुरक्षित नाही, कोणालाही अटक होऊ शकते; संजय राऊत यांचा भाजपवर निशाणा)

शिवसेना (UBT) सांगलीच्या जागेवर ठाम

दरम्यान, सांगलीची जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्षच लढेन. तिथे खुद्द पक्षप्रमुखांनी उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे त्या जागेचा प्रश्नच उद्भवत नाही, असा पुनरुच्चार संजय राऊत यांनी केला. दरम्यान, भिवंडी लोकसभा मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दावा सांगितला आहे. त्यावर आम्ही सर्वजण चर्चा करत आहोत, असे राऊत म्हणाले. दरम्यान, अॅड. प्रकाश आंबेडकर आजही महाविकासआघाडीचाच एक भाग आहेत. त्यांच्याशी आमची निरंतर चर्चा सुरु आहे. प्रकाश आंबेडकर हे निरंतर चर्चा करावे, असे व्यक्तीमत्त्व आहे. त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर आम्हालाही उर्जा मिळते. त्यामुळे त्यांच्याशी सकारात्मक बोलणी सुरु आहेत, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. (हेही वाचा, Sanjay Raut on PM Narendra Modi: औरंगजेबी वृत्तीची गुजरात आणि दिल्लीवरून महाराष्ट्रावर चाल; संजय राऊत यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा)

लोकसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला. त्यानंतर अल्पावधीतच भाजप आणि त्यापाठोपाठ काँग्रेस पक्षानेही आपली उमेदवार यादी जाहीर केली. शिवसेना (UBT) पक्षानेही आपली उमेदवार यादी जाहीर केली आहे. दरम्यान, महायुती आणि महाविकासआघाडी यांच्यात अद्यापही काही जागांवर तोडगा निघाला नाही. त्यामुळे या जागांवरील उमेदवार अद्यापही जाहीर झाले नाही, या पार्श्वभूमीवर संजय राऊत हे मुंबई येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते.