शिवसेना मंत्री काँग्रेस आमदारांचा मानसन्मान ठेवत नाहीत; आमदार सुभाष धोटे यांचा आरोप
Nationalist Congress Party, Shiv Sena, Congress Party | (Photo Credit: Archived, Edited And Representative images)

महावकासआघाडी सरकारमध्ये कोणत्याही प्रकारचे मतभेद, बेबनाव नाही असे शिवसेना (Shiv Sena , राष्ट्रवादी (NCP) आणि काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते सांगत आहेत. असे असले तरी वास्तवातले चित्र मात्र भलतेच असल्याचे पुन्हा एकदा पुढे आले आहे. शिवसेना मंत्री काँग्रेस आमदारांचा मानसन्मान ठेवत नाहीत, असा थेट आरोप चंद्रपूरमधील राजुरा येथील काँग्रेस (Congress) आमदार सुभाष धोटे (Subhash Dhote) यांनी केला आहे. तसेच त्यांनी आपली नाराजी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कानावरही घातली आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे विदर्भातील महाविकास आघाडीसोबतच्या आमदारांशी 19 जुलै रोजी चर्चा केली. या वेळी आमदार धोटे यांनी ही नाराजी बोलून दाखवली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेल्या आमदारांच्या चर्चेवेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा मंत्री बाळासाहेब थोरात, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, ऊर्जामंत्री नितीन राऊत, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा उपस्थित होते. या वेळी आमदार सुभाष धोटे यांनी शिवसेना मंत्री काँग्रेस आमदारांचा मानसन्मान ठेवत नाहीत. कामेही करत नाहीत. असे होत असेल तर आम्ही जनतेला कसे तोंड दाखवायचे? असा सवालही धोटे यांनी विचारला. धोटे यांनी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांचा थेट नामोल्लेख करत आपली नाराजी व्यक्त केल्याचे समजते. एकनाथ शिंदे हे काँग्रेस आमदारांचा मनसन्मान ठेवत नाहीत. कृपा करुन त्यांना आमदारांचा मानसन्मान ठेवण्याचे निर्देश द्या अशी थेट विनंतीच धोटे यांनी मुख्यमंत्र्यांना केली. (हेही वाचा, मी म्हणजे काही डोनाल्ड ट्रम्प नाही, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे संजय राऊत यांनी घेतलेल्या मुलाखतीत रोखठोक भाष्य (Watch Video)

मुख्यमंत्री आणि थेट शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समोरच काँग्रेस आमदाराने एकनाथ शिंदे यांचे नाव घेऊन नाराजी व्यक्त केली. त्यामुळे महाविकासआघाडी सरकारमध्ये सर्व काही अलबेल नसल्याचे चित्र पुन्हा एकदा समोर आले आहे. या आधिच्या सरकारने (युती सरकार) नगरपालिका निधी बांधकाम विभागाकडे हस्तांतरीत केला होता. हा निधी पुन्हा एकदा नगरपालिकांकडे वळवावा यासाठी आमदार धोटे यांनी नगरविकास मंत्री शिंदे यांच्यासोबत पत्रव्यवहार केला होता. यासंदर्भात दोन पत्रं आमदार धोटे यांनी मंत्री शिंदे यांना पाठवली होती. मात्र त्यावर कोणताही कार्यवाही झाल नाही. आपण पत्र व्यवहार केला. तसेच, तत्कालीन नगरविकास खात्याच्या सचिव मनिषा म्हैसकर यांनी सांगितल्यानंतरही काम झाले नाही. काँग्रेस हासुद्धा महाविकासआघाडीचाच घटक पक्ष आहे. त्यामुळे काँग्रेस आमदारांचीही कामे व्हायला हवीत असे उद्धव ठाकरे म्हणाले. दरम्यान, मंत्री एकनाथ शिंदे यांनी आपले काम लवकरच केले जाईल, असे अश्वासन दिले.