राज्यात अतिवृष्टी आणि त्यामुळे निर्माण झालेल्या पुरपरिस्थितीत शेतकऱ्यांना तात्काळ मदत करण्याची मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे. यावरुन आता पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांना टोला लगावला आहे. "राज ठाकरेंनी मागणी केली म्हणजे काही मोठं काम केलं नाही. मागणी करणं सोपं आहे," असं पाटील म्हणाले. गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) नाशिक दौऱ्यावर असताना पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना त्यांनी हा टोला लगावला.
राज्यातील पूरपरिस्थिती आणि विरोधकांकडून होणारी मदतीची मागणी यावरुन पाटील यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले, "राज ठाकरे यांनी मागणी केली हे मान्य आहे, पण मागणी केली म्हणजे काही मोठं काम केलं नाही. मागणी करणं सोपं आहे." पुढे ते म्हणाले की, "पंचनामे झाल्यानंतर शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत निर्णय घेतला जाईल. तसंच प्रत्येक जिल्ह्याची परिस्थिती पाहून ओला दुष्काळ जाहीर केला जाईल. यात कुणीही राजकारण करु नये," असं आवाहनही त्यांनी यावेळी केले.
दरम्यान, राज्यातील पुरपरिस्थितीवरुन राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. यात त्यांनी शासनाने ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी आग्रही मागणी केली आहे. त्याचबरोबर पंचनाम्यांचे सोपस्कार होत राहतील. परंतु, त्याआधी प्रत्येक नुकसानग्रस्त घराला-शेतकऱ्याला 50,000 रुपयांची मदत सरकारने तातडीने जाहीर करावी आणि ती प्रत्यक्षात तात्काळ द्यावी असे म्हटले आहे. तर शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार ठामपणे उभे आहे, असं म्हणत शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी यापूर्वी दिले आहे.