भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. संजय राऊत (Sanjay Raut) हे वाईनबद्दल इतके का बोलत आहेत. संजय राऊत यांची वाईन व्यवसायात गुंतवणूक आहे. वाईनचा व्यवसाय करणाऱ्या एका बड्या उद्योगासोबत संजय राऊत (Kirit Somaiya On Sanjay Raut) यांची पार्टनरशीप आहे, असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. ते आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. राज्यातील महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) राज्यातील सुपर मॉल आणि किराणा दुकानात वाईन (Wine) विक्रीस परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयावर भाजपने जोरदार टीकास्त्र सोडले आहे.
आपण केलेले आरोप संजय राऊत यांनी खोडून दाखवावेत असे आव्हानही किरिट सोमय्या यांनी संजय राऊत यांना दिले आहे. संजय राऊत सांगतात वाईन म्हणजे दारु नव्हे. तर मग वाईन काय आहे. आपला आणि वाईनचा संबंधच काय? मी माझ्या आयुष्यात कधी अंडी खाल्ली नाहीत, बीडी ओढली नाही की सिगारेटही ओढली नाही. वाईन आणि बियरही नाही. मग तुमचा आणि वाईनचा संबंध काय? असा सवाल सोमय्या यांनी उपस्थित केला (हेही वाचा, Sanjay Raut On Pm Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भोवती व्यापाऱ्यांची भिंत, त्यामुळे भारतीय राजकारणाचा इव्हेंट झाला- संजय राऊत)
संजय राऊत कुटुंबाने काही महिन्यापूर्वी वाईन व्यवसायातील मोठ्या उद्योगपतीशी बिझनेस पार्टनरशीप सुरू केली आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सर्व सहयोगी यांचे कारनामे हे केवळ पैसे आणि पैसे गोळा करणे इतकेच आहे. हे सरकार महाराष्ट्राला मद्य राष्ट्र बनवायला निघाले आहे, असा आरोपही किरीट सोमय्या यांनी केला.
संजय राऊत आणि त्यांच्या पत्नी तसेच कन्येची किती व्यवसायांध्ये अधिकृत भागिदारी आहे ते सांगावे. किती व्यवसायात त्यांनी जॉईंट व्हेंचर केले आहे तेही महाराष्ट्राला सांगावे. संजय राऊत यांनी मॅगपी ग्रुप अशोक गर्ग यांच्या बरोबर किती महिन्यांपूर्वी व्यवसायिक भागीदारी केली हे सांगावे, असेही सोमय्या म्हणाले. राज्य सरकारच्या निर्णयामुळे राज्य सरकारचा महसूल वाढणार आहेच. पण त्यासोबत ठाकरे आणि राऊत कुटुंबीयांचाही वाढणार असल्याचे सोमय्या म्हणाले.