Sanjay Raut | (Photo Credits-ANI)

शिवसेना (Shiv Sena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दैनिक सामनामध्ये लिहिलेल्या 'रोखठोक' या रविवारच्या सदरात पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi), हिंदुत्त्ववाद आणि शिवसेना- भाजप (Shiv Sena-BJP) यांच्यात ताणलेले संबंध अशा विविध मुद्द्यांवर भाष्य केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भोवती व्यापाऱ्यांची भींत आहे. तसेच, पंतप्रधान मोदी यांनी भारतीय राजकारणाचा इव्हेंट केला आहे. या इव्हेंटमुळे भाजपला झळाळी आल्याचेही राऊत यांनी म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे राजकारण हे उत्सवी स्वरुपाचे आहे. जगाच्या पाठीवर अशा प्रकारचे राजकारणाचा उत्सव कधीच कोणी केला नसेल असेही राऊत यांनी म्हटले आहे.

आजच्या घडीला पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच भाजपचे नेते आहेत. नरेंद्र मोदी यांच्या उदयानंतरच महाराष्ट्रामध्ये भाजपला चांगले यश मिळू शकले. इतकेच नव्हे तर, भारतीय राजकारणात आतापर्यंत कधी झाला नसेल इतका पैशांचा वापर निवडणुकांच्या राजकारणात मोदींच्या उदयानंतर झाल्याचेही राऊत यांनी म्हटले आहे. पंतप्रधान मोदीं आणि शाह यांच्या आगोदर भाजपमध्ये प्रमोद महाजन हेच नेते होते. उद्योग जगतात त्यांना मुक्तप्रवेश होता. तसेच, भाजपला जो काही निधी मिळत असे तो केवळ महाजन यांच्यामुळेच मिळत होता असेही राऊत यांनी म्हटले आहे. दरम्यान, त्यांचे बाळासाहेब ठाकरे यांच्याशी उत्तम संबंध असले तरी बाळासाहेब जाहीरपणे भाजपचा उल्लेख 'कमळी' असा करून खिल्ली उडवत. तरीही दोन पक्षांत कधी कटुता आली नव्हती. जागा वाटपात ठरल्याप्रमाणे शिवसेनेचाच वरचष्मा असे. असे असतानाही भाजपच्या जागा घासाघीस करुन वाढत गेल्या, असे राऊत यांनी म्हटले.

ट्विट

पाकिस्तानची निर्मिती ही जीनांची मागणी होती. जर खरे हिंदुत्ववादी असते तर त्यांनी गांधींना नव्हे तर जिना यांना गोळ्या घातल्या असत्या. असे कृत्य देशभक्तीचे कृत्य ठरले असते. गांधीजींच्या निधनावर आजही जग शोक करीत आहे, असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे.