महिला ऑटो चालकाचा छळ करून शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडल्याच्या आरोपावरून शिवसेनेने (Shiv Sena) पक्षाच्या एका नेत्याची पक्षातून हकालपट्टी केली आहे. या प्रकरणावर पक्षाच्या ज्येष्ठ नेत्याने सांगितले की, आरोपी जितेंद्र खाडे (Jitendra Khade) यांना तत्काळ बडतर्फ करण्यात आले आहे. तर दुसरीकडे पोलिसांनीही याप्रकरणी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना एका व्हायरल व्हिडिओवरून समोर आली आहे. ज्यामध्ये महिलेने त्याला मारहाण केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, श्रीनाथ नगर येथील वॉर्ड प्रमुख जितेंद्र खाडे याने एका महिला ऑटो चालकाची छेड काढली. एवढेच नाही तर खाडे याने महिलेवर शारीरिक संबंध ठेवण्यासाठी दबाव आणल्याचा आरोप आहे. विरार पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सुरेश वर्दे यांनी सांगितले की, खाडे याने महिला ऑटोचालकाच्या गाडीतून तिचा नंबर घेतला आणि नंतर फोन करून तिला त्रास देण्यास सुरुवात केली. एवढेचं नाही तर त्याने महिलेवर शारीरिक संबंध ठेवण्यासाठी दबाव टाकला. तसेच ती महिला यास सहमत नसल्याने खाडे याने त्या महिलेला इतर महिलांचे नंबर विचारण्याचा प्रयत्न केला. (वाचा - Sanjay Raut On Pm Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भोवती व्यापाऱ्यांची भिंत, त्यामुळे भारतीय राजकारणाचा इव्हेंट झाला- संजय राऊत)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 24 जानेवारी रोजी महिलेने खाडे यांना विरार येथील फुलपारा येथे भेटण्यासाठी बोलावले. तो तेथे पोहोचताच पूर्वनियोजित योजनेनुसार महिलेने स्थानिक लोकांच्या मदतीने त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर आरोपीला पोलिस ठाण्यात आणण्यात आले. पोलिसांनी आरोपीविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यानंतर शिवसेनेने कारवाई करत आरोपीला तत्काळ पक्षातून काढून टाकले.
शिवसेनेचे पालघरचे जिल्हाध्यक्ष वसंत चव्हाण म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार जितेंद्र खाडे यांची पक्षातून तडकाफडकी बडतर्फी करण्यात आली आहे. महिलांच्या छेडछाडीविरोधात शिवसेनेचे शून्य सहनशीलतेचे धोरण असून खाडे यांनी पक्षाची बदनामी केली असल्याचे ते म्हणाले.