युती धर्माचं पालन करा, आता प्रस्ताव नको, थेट चर्चाच हवी; शिवसेनेने भाजपला खडसावले
Sanjay Raut | (Photo Credits: ANI)

BJP-Shiv Sena Political Battle For Power: राजकारणात पर्याय सर्वांनाच खुले असतात. पण, आम्हाला ते पाप करायचे नाही. तसेच, सत्तावाटपाचा 50-50 फॉर्म्युला ठरला आहे. त्यामुळे भाजपने युतीधर्माचे पालन करावे. आता या पुढे कोणताही प्रस्ताव नको थेट चर्चाच हवी, अशा शब्दांत शिवसेनेने मित्रपक्ष भाजपला खडसावले आहे. शिवसेना (Shiv Sena) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना भाजपला हा इशारा दिला.

या वेळी बोलताना राऊत म्हणाले, शिवसेना बदलली नाही. ती जिथे आले तिथेच आहे. राजकारणात पर्याय सर्वांनाच खुले असतात. ज्यांच्या मनात पाप आहे त्यांनी पर्याय शोधावेत. परंतू, आम्हाला युतीधर्म पाळायचा आहे. भाजपनेही तो पाळावा. शिवसेना हा छोटा पक्ष नाही. सत्तावाटपाचे जे सूत्र ठरले आहे तसेच व्हावे. जर शब्द दिला आहे तर तो पाळला गेला पाहिजे, असे सांगत शिवसेना मुख्यमंत्री पदावरुन आक्रमक असल्याचे पुन्हा एकदा राऊत यांनी स्पष्ट केले. (हेही वाचा, 'आमचं ठरलंय पण, मुख्यमंत्री पदावर अडलंय', भाजप-शिवसेना '50-50 फॉर्म्युला' सोशल मीडिया, जनतेत थट्टेचा विषय)

दरम्यान, विधानसभा निडणुकीत भाजप स्वबळावर सत्ता स्थापण करु शकेन अशी भाजप नेतृत्वाला आत्मविश्वास होता. परंतू, जनमताचा कौल पाहता भाजपच्या आत्मविश्वासाला धक्का बसला. विधानसभा निवडणुकीत एकूण 288 जागांपैकी शिवसेना ही 124 तर भाजप हा 164 जागांवर लढत होता. उर्वरीत जागांव युतीचे मित्रपक्ष लढत होते. तर, दुसऱ्या बाजूला काँग्रेस-राष्ट्रवादी हे पक्ष आघाडी करुन लढत आहेत. काँग्रेस 147 तर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने 124 जागा लढवल्या. त्यापैकी भाजप 105, शिवसेना 56, राष्ट्रवादी काँग्रेस 54 , काँग्रेस 44 आणि इतर पक्षांना 29 जागा मिळाल्या. त्यामुळे 145 हा बहुमताचा जादूई आकडा गाठायचा तर शिवसेनेला सोबत घेतल्याशिवाय भाजपला गत्यंतर नाही असे चित्र सध्यातरी पाहायला मिळत आहे.