'दोन काटे जागेवरच ठेऊन घड्याळाला चावी मारतोय' शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची राष्ट्रवादी काँग्रेस नेतृत्वावर मिश्किल टिप्पणी
Uddhav Thackeray। (Photo Credit: Twitter)

'दोन काटे जागेवरच ठेऊन घड्याळाला चावी मारतोय' असा मिश्किल टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shiv Sena Party Chief Uddhav Thackeray) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांना लगावला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि नेते अजित पवार (Ajit Pawar) या काका पूतण्यांचा नामोल्लेख न करता ठाकरे यांनी लगावलेल्या सूचक टोल्याची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी ही मिश्किल टिप्पणी करण्यासाठी निमित्त ठकरे ते राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहीर (Sachin Ahir) यांचा शिवसेना (Shiv Sena) पक्ष प्रवेश. त्याचे झाले असे..

राजकारण म्हटलं की, कधी आरोप प्रत्यारोप, सनसनाटी वक्तवे, टोलेबाजी तर कधी मिश्किल कोपरखळी हे ओघानेच आले. कोणत्याही राजकारण्यांना या गुणांशिवाय राजकारण रेटने तसे अवघडच. आपली वक्तव्ये आणि मतं ही राजकारण्यांचा स्वभाव आणि व्यक्तिमत्व दर्शवतात. महाराष्ट्राच्या सत्तेबाहेरचं सत्ताकेंद्र अशी ओळख असलेलं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेही असंच एक व्यक्तिमत्व. एक उत्कृष्ठ नेता आणि छायाचित्रकार म्हणून ते प्रसिद्ध आहेत. पण, एक विनोदी आणि मिश्किल राजकारणी म्हणूनही उद्धव ठाकरे महााष्ट्राला परिचित आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहीर यांच्या शिवसेना पक्ष प्रवेशावेळी उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना मिश्किल टिप्पणी केली. ज्याला उपस्थितांनीही मनमोकळे हसून दाद दिली.

काय घडले नेमके?

मुंबई आणि महाराष्ट्राच्या राजकारणात आज (गुरुवार, 25 जुलै 2019) एक महत्त्वपूर्ण घटना घडली. प्रदीर्घ काळ मंत्री आणि सत्ताधारी पक्षात राहिलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहीर यांनी आज शिवसेना पक्षात प्रवेश केला. शिवसेना पक्षप्रुमख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत 'मातोश्री' येथे हा पक्षप्रवेश पार पडला. या वेळी उद्धव ठाकरे यांना पत्रकारांनी विचारले की, 'आजवर आम्ही काट्याने काटा काढणे ऐकले होते. तुम्ही तर धनुष्यानेच काटा काढला'. यावर उद्धव ठाकरे म्हणाले की, 'असे काही नाही मी केवळ दोन काटे जागेवरच ठेऊन घड्याळाला चावी देतो आहे.' उद्धव ठाकरे यांच्या या विधानाने उपस्थितात चांगलीच खसखस पिकली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेतृत्व शरद पवार, अजित पवार आणि पवार कुटुंबीयांकडे असल्याने ठाकरे यांच्या टिप्पणीचा रोख कोणाकडे होते हे अर्थातच उपस्थितांना समजले. (हेही वाचा, सचिन अहीर यांचा शिवसेना प्रवेश; उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत बांधल शिवबंधन; राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला धक्का)

दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी या अधीही अनेकदा अशा मिष्कील टिप्पणी केल्या आहेत. मागे एकदा पत्रकारांनी मुंबई शहरात डास अधिक वाढले आहेत. महापालिका काय करते अशे विचारले होते. योगायोग असा की या वेळी शिवसेना भाजप संबंध ताणले होते. या वेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, 'राजकारणातील डास मी मारतो महापालिकेतील तुम्ही मारा.' तसेच, उद्धव ठाकरे यांनी मनसे युतीबाबत टाळी एका हताने वाजत नाही असे म्हणत दिलेली प्रतिक्रियाही अनेकांच्या लक्षात असेलच.