Shiv Sena On Ramdas Kadam: रामदास कदम यांना शिवसेनेकडून प्रत्युत्तर, स्व:ता आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला
Shiv Sena On Ramdas Kadam | (Photo Credit: Archived, edited, representative images)

शिवसेना (Shiv Sena) नेतेपदाचा राजीनामा दिल्यानंतर शिवसेनेवर तोफ डागणाऱ्या रामदास कदम (Ramdas Kadam) यांना शिवसेनेने प्रत्युत्तर दिले आहे. शिवसेनेला आत्महपरीक्षण करण्याचा सल्ला देण्यापेक्षा रामदास कदम यांनी स्वत:च आत्मपरिक्षण करावे, असा सल्ला शिवसेना (Shiv Sena) प्रवक्ते अरविंद सावंत यांनी दिला आहे. एपीबी माझा या वृत्तवाहीशी बोलताना अरविंद सावंत यांनी रामदास कदम यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले. अरविंद सावंत यांनी रामदास कदम यांच्यावर निशाणा साधताना म्हटले की, उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यापासून या लोकांनी एक अवाक्षरही काढले नाही. मी मरेपर्यंत शिवसेनेसोबतच राहीन एवढं ते बोलल्याचं माझ्या लक्षात आहे, असेही अरविंद सावंत यांनी म्हटले आहे.

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पद स्वीकारल्यानंतर या माणसाने कधी अभिनंदनही केले नव्हते. अडीच वर्षात त्यांनी मातोश्रीवर पाय ठेवला होता का? असा सवाल विचारताच शिवसेना नेते म्हणून तुमची नैतिक जबाबदारी होती, अशी आठवणही अरविंद सावंत यांनी रामदास कदम यांना या वेळी करुन दिली. ही स्वयंकेंद्रीत लोकं असून, मोठ्या मनाची नव्हती आणि आजही नाहीत, अशा थेट शब्दांत अरविंद सावंत यांनी रामदास कदम यांच्यावर टीकास्त्र सोडले.

एका विधानसभा निवडणुकीत जनतेने तुम्हाला नाकारले. तेव्हा आपण पक्षप्रमुखांकडे येऊन म्हणालात की आमचे पुनर्वसन करा. या वेळी आपण राष्ट्रवादी काँग्रेससोबत साठंलोठं सुरु केले. त्यामुळे पक्षाने वेळीच काळजी घेऊन इतर शिवसैनिकाची संधी नाकारुन तुमचे पुनर्वसन केले. तुम्हाला विधानपरिषदेवर संधी दिली. असं असूनही तुमचं समाधान होत नाही का? असा सवालही अरविंद सावंत यांनी कदम यांना केला आहे.

दरम्यान, रामदास कदम यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना अनेक विषयांवर भाष्य केले. शिवसेना पक्षासोबत 52 वर्षे राहिलो. शिवसेना वाढविण्यासाठी जीवाचे रान केले. असे असताना आम्हाला हे दिवस पाहायला लागले. माझा मुलगा शिवसेना आमदार असतानाही त्याला त्रास देण्यात आला. राष्ट्रवादीने शिवसेना संपविण्यासाठी जोरदार प्रयत्न केले. पक्ष फुटायला आला फुटला तरीही उद्धव ठाकरे साहेब शरद पवार यांना सोडायला तयार नाहीत. उद्धव ठाकरे यांनी आमदार का फुटले याबाबत विचार करायला पाहिजे, असे रामदास कदम यांनी म्हटले होते.