डबलबारी बंदुकीतून हवेत गोळीबार, लक्ष्मीपूजनाला फटाक्यांसारखा आवाज; शिरोलीचे सरपंच शशिकांत खवरे यांच्यावर गुन्हा दाखल
(संग्रहित, संपादित प्रतिमा)

फटाके फोडण्यावर राज्य सरकारने घातलेल्या बंदीवर दस्तुरखुद्द सर्वोच्च न्यायालयानेच शिक्कामोर्तब केले. त्यामुळे राज्यभरात ऐन दिवाळीतही फटाक्यांची आतषबाजी आणि कानठळ्या बसवणाऱ्या आवाजांपासून जनतेची सुटका झाली. पण, लक्ष्मीपूजनाचा दिवास मात्र कोल्हापुरच्या शिरोलीकरांसाठी काहीसा धक्कादायक ठरला. लक्ष्मी पूजनाच्या दिवशी फटाक्यांसारख्या पण काहीशा वेगळ्या आवाजाने शिरोली परिसर हादरुन गेला. शिरोलीचे सरपंच शशिकांत खवरे यांनी लक्ष्मीपूजनाला चक्क बंदुकीनेच बार काढले. भर रस्त्यावर अचानक घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात ऐन सणाच्या दिवशीही एकच खळबळ उडाली.

काल (बुधवार, 7 नोव्हेंबर) लक्ष्मीपूजन. दिवाळ सणातील एक महत्त्वाचा दिवस. या दिवशी लक्ष्मीपूजन आटोपल्यावर सरपंच शशिकांत खवरे आपल्या कार्यकर्त्यांसह रस्त्यावर आले. त्यांनी डबलबारी बंदूक आणि पिस्तुलातून हवेत गोळीबार केला. ही घटना सध्याकाळी पावणे सातच्या सुमारास घडली. गोळीबाराचा आवाज येताच परिसरात एकच घबराटीचे वातावरण निर्माण झाले. दरम्यान, शशिकांत खवरे हे शिरोलीचे लोकनियुक्त सरपंच आहेत. त्यामुळे सहाजिकच त्यांना लोकांच्या मनात वेगळं स्थान आहे. त्यांचाही लोकांवर प्रभाव आहे. त्यामुळे समाजात लोकनियुक्त आणि मानाचे पद भूषवणाऱ्या व्यक्तिनेच असे वर्तन करणे धक्कादायक असल्याची भावना सर्वसामान्य जनतेतून व्यक्त होत आहे. (हेही वाचा, लक्ष्मी पावलं रांगोळीच्या माध्यमातून अशा '7' प्रकारे काढाल तर घरात नक्की प्रवेश करेल लक्ष्मी)

दरम्यान, शशिकांत खवरे यांनी केलेल्या कृत्याची माहिती मिळताच शिरोली पोलिसांनी कायदेशिर कारवा केली आहे. खवरे यांच्या विरोधात भारतीय शस्त्र अधिकनियम 1959 च्या कलम 30 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खवरे हे डबलबारी बंदूक आणि पिस्तुतालून गोळीबार करत असतानाचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दरम्यान, लक्ष्मीपूजन आटोपल्यावर उत्साहाच्या भरात खवरे यांच्याकडून हा प्रकार घडल्याचे त्यांचे कार्यकर्ते सांगत आहेत.