शिर्डी बंद करुन वाद संपणार नाही- छगन भुजबळ
Chhagan Bhujbal (Photo Credits: Facebook)

साईबाबा जन्मस्थळाच्या (Saibaba Birthplace) वादावरून आजपासून बेमुदत शिर्डी बंद पुकारण्यात आला आहे. या प्रकरणी उद्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तातडीची बैठक बोलावली आहे. यासंबंधी आज अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) शिर्डीत दाखल झाले असून त्यांनी साईबाबांचे दर्शन घेतले. जन्म स्थळावरून राजकारण न करता, बंद करुन वाद संपणार नाही असे भुजबळांनी यावेळी सांगितले. तसेच मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन हा वाद मिटविण्याचा प्रयत्न करावा असेही त्यांनी यावेळी सांगितले. दोन्ही बाजू ऐकून घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे योग्य तो निर्णय घेतील असे छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

छगन भुजबळ यांनी शिर्डी बंद संदर्भात घेतलेल्या पत्रकार परिषदेत बंद केल्याने तोडगा निघणार नाही, त्यामुळे राजकारण न करता एकत्र बसून हा प्रश्न सोडवावा असे आवाहन केले आहे. तसेच 20 जानेवारीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जी यासंदर्भात जी बैठक घेणार आहे त्यात ते दोन्ही बाजू ऐकून घेऊन योग्य तो निर्णय घेतील असेही भुजबळ म्हणाले.

हेदेखील वाचा- साईबाबा जन्मस्थळ वादावरून आज पासून बेमुदत शिर्डी बंद; मंदिर मात्र सुरु राहणार

काही दिवसांपूर्वी पाथर्डी ग्रामस्थांनी साईबाबांचा जन्म पाथरी मध्ये झाल्याचे दावे केले होते यात भर म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या औरंगाबाद सभेत "ज्या ठिकाणी साईबाबांचा जन्म झाला, तिथे 100 कोटींची विकासकामांचा आरखडा तयार करण्यात आला असून लवकरच भूमिपूजन देखेल होईल" अशी घोषणा केली होती. यानंतर शिर्डी ग्रामस्थांनी अधिकच आक्रमक होऊन पाथरी मध्ये 100 नव्हे तर 200 कोटींची कामे केली तरी चालतील पण त्या ठिकाणाला साईबाबांचे जन्मस्थळ म्हणून संबोधू नका असा पवित्र स्वीकारला होता.

शिर्डी ग्रामस्थांनी याबाबत प्रतिक्रिया देताना, ‘साईसतचरित्र’मध्ये साईबाबांच्या जन्मस्थळाचा व वास्तव्याच्या ठिकाणाचा स्पष्ट उल्लेख आहे, मात्र तरीही अनेक ठिकाणी साईंच्या जन्माचे दावे केले जातात इतकेच नव्हेत तर साईबाबांना या पूर्वी सुद्धा अनेकांनी धर्मात अडकवून ठेवण्याचा प्रयत्न केला आहे असे देखील म्हंटले आहे. याच बाबींच्या निषेधार्थ हा बंद पुकारण्यात आला आहे.